Taxi -Auto Fare Hike : टॅक्सी अन् ऑटो रिक्षाची 3 रुपयांची भाडेवाढ, मूळ भाड्यानंतर प्रत्येक किलोमीटरला किती रुपये द्यावे लागणार?
Taxi Fare Hike : नववर्षात एसटीसह रिक्षा अन् टॅक्सीच्या भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला. रिक्षा अन् टॅक्सीची भाडेवाढ 1 फेब्रुवारीपासून लागू करण्यात आलेली आहे.
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटीची दरवाढ कालपासून लागू करण्यात आली. एसटीनं 14.95 टक्के भाडेवाढीचा निर्णय घेतला आहे. याशिवाय रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. रिक्षा अन् टॅक्सीच्या मूळ भाड्यात 3 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही वाढ 1 फेब्रुवारीपासून लागू केली जाईल.
ऑटोरिक्षाचं दीड किलोमीटर अंतरामध्ये मूळ भाडं 23 रुपयांवरुन 26 रुपये झालं आहे. तर, मुंबईतील काळी पिवळी टॅक्सीचं भाडं 28 रुपयांवरुन 31 रुपये झालं आहे. तर, कूल कॅबच्या भाड्यात 8 रुपयांची वाढ झाली आहे. ते 40 रुपयांवरुन 48 रुपये झालं आहे. शेअर टॅक्सीचं भाडं देखील 10 रुपयांवरुन 12 रुपये होईल.
दीड किलोमीटर अंतरानंतर प्रवाशांना प्रत्येक किलोमीटरसाठी अधिकची रक्कम मोजावी लागणार आहे. ऑटोरिक्षासाठी 17.1 रुपये द्यावे लागतील. यापूर्वी त्यांना 15.3 रुपये द्यावे लागत होते. टॅक्सीसाठी प्रत्येक अतिरिक्त किलोमीटरसाठी 20.7 रुपये द्यावे लागतील. तर कूल कॅबसाठी 37.2 रुपये द्यावे लागतील.
समजा एखाद्या प्रवाशाला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून वरळीला सध्याच्या दरात टॅक्सीनं पोहोचायचं असेल तर त्याला 138 रुपये द्यावे लागतात. भाडेवाढीनंतर त्याला 153 रुपये द्यावे लागतील. अंधेरी स्टेशन ते साकीनाका या दरम्यानचं भाडं 89 रुपये आहे ते दरवाढीनंतर 99 रुपये होईल.
दरम्यान, ऑटोरिक्षा आणि टॅक्सी चालकांना मीटर रीकॅलिब्रेशनसाठी तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. मुंबईत साधारणपणे 100 ऑटो-टॅक्सी स्टँड आहेत. नवे दर 1 फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत.
रिक्षानं प्रवास करणाऱ्यांना 20 किलोमीटर अंतरासाठी 343 रुपये, 10 किलोमीटर अंतरासाठी 170 रुपये मोजावे लागतील. 5 किलोमीटरसाठी 86 रुपये द्यावे लागतील.
टॅक्सीनं प्रवास करणाऱ्यांना 5 किलोमीटरला 103 रुपये, 10 किलोमीटरला 207 रुपये आणि 20 किलोमीटरला 413 रुपये मोजावे लागणार आहेत. एसटी, रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीनं प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
एमएमआरटीएनं मेट्रो 3 च्या स्थानकांजवळ 7 ऑटो रिक्षा स्टँड उभारणीला मंजुरी दिली आहे. बीकेसी मेट्रो स्टेशन जवळ 2 स्टँड, बांद्रा कॉलनी (विद्यानगरी)मध्ये 2, सांताक्रुझ मेट्रो स्टेशन एक्झिट गेट,टर्मिनल 1 एक्झिट गेट आणि सहार रोड मेट्रो स्टेशन जवळ 1 ऑटो रिक्षा स्टँड उभारणीला मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय एमएमआरमध्ये 2 काळी पिवळी टॅक्सी स्टँड, 68 ऑटो स्टँड आणि नऊ शेअर ऑटो स्टँडला मान्यता देण्यात आली आहे.
दरम्यान, ऑटो रिक्षा आणि टॅक्सी यूनियनकडून दोन वर्षाहून अधिक काळानंतर दरवाढ झाल्याचं सांगण्यात आलं आहे. डिझेल, सीएनचीच्या दरवाढीसह इतर कारणांमुळं भाडेवाढ अपरिहार्य असल्याचं यूनियनकडून सांगण्यात आलं.
इतर बातम्या :