Vivek Agnihotri Explanation On Controversial Comment: वरण-भाताला गरिबांचं जेवण म्हणणाऱ्या विवेक अग्निहोत्रींचा युटर्न; आता म्हणाले, 'मी गंमतीत...'
Vivek Agnihotri Explanation On Controversial Comment: वरण-भाताला गरिबांचं जेवण म्हणणाऱ्या विवेक अग्निहोत्रींचा नेटकऱ्यांनी चांगलाच समाचार घेतला. अशातच विवेक अग्निहोत्रींनी आता आपल्या वक्तव्यावरुन युटर्न घेतला आहे.

Vivek Agnihotri Explanation On Controversial Comment: प्रसिद्ध बॉलीवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) हे अशा चित्रपट निर्मात्यांपैकी (Filmmakers) एक आहेत, जे त्यांच्या चित्रपटांसोबतच त्यांच्या स्पष्ट आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. 'द काश्मीर फाइल्स'सारखा ब्लॉकबस्टर चित्रपट दिल्यानंतर, विवेक आता त्यांचा पुढचा चित्रपट 'द बंगाल फाइल्स' (The Bengal Files) घेऊन येत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादात सापडला आहे. पण, त्याहीपेक्षा विवेक अग्निहोत्री स्वतः वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यासाठी कारण ठरतंय, विवेक अग्निहोत्रींनी मराठी जेवणाबाबत आणि त्यातल्या त्यात वरण-भातावर केलेलं वक्तव्य. विवेक अग्निहोत्रींच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर वादळ निर्माण झालेलं. आता त्यांनी त्यांच्या नव्या मुलाखतीत बोलताना स्वतःच्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
'द रौनक पॉडकास्ट'ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना विवेक अग्निहोत्री म्हणाले की, "एक गंमतीशीर गोष्ट घडली. कर्ली टेल्स पॉडकास्टचे आमच्या घरी आलेले, त्यामध्ये खाण्याबद्दल वगैरे बोलत होतो. त्यात मी गंमतीत म्हणालो की, मी जेव्हा दिल्लीहून मुंबईला गेलो होतो, तेव्हा महाराष्ट्रीयन असणाऱ्या पल्लवीने मला वरण भात खाऊ घातला. वरणात तर मीठही नसतं, तर मी दिल्लीवाले जसे असतात त्या शैलीत म्हटलं की, अरे हे काय मी गरिबांचं खाणं खाऊ? पण, त्यानंतर पुढच्या ओळीत मी असंही म्हणालो होतो की, जशी मला अक्कल आली तेव्हा समजलेलं की, भारतात महाराष्ट्रीयन अन्न हे सर्वात हेल्दी आहे. जे मी आता खूप आवडीने खातो. वरण भात माझं आवडतं खाणं आहे."
"मला कोणत्याच वादात अडकवू नका..." : विवेक अग्निहोत्री
"आता काहींनी काय केलं, सुरुवातीचं वाक्य उचललं की, महाराष्ट्रातील अन्नाला गरिबांचं जेवण म्हणाला... याला पकडून मारा. त्यामुळे मला कोणत्याच वादात अडकवू नका. आजकाल लोक एडिट करतात...", असं त्यांनी पुढे बोलताना स्पष्ट केलं.
विवेक अग्निहोत्री नेमकं काय म्हणालेले?
'द कर्ली टेल्स'ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना विवेक अग्निहोत्री यांच्या पत्नी आणि अभिनेत्री पल्लवी जोशी देखील उपस्थित होत्या. त्यावेळी पल्लवीला विचारण्यात आलं की, विवेकला कोणता पदार्थ सर्वात जास्त आवडतो. यावर पल्लवी हसली आणि म्हणाली की, "मी त्याच्यासाठी मराठी जेवण बनवते, पण तो म्हणतो की, तू गरिबांचं जेवण का बनवतेस?" यावर विवेक अग्निहोत्री म्हणाले की, "मी दिल्लीचा आहे आणि तिथलं जेवण थोडं वेगळं असतं. दिल्लीतील जेवणाची खासियत म्हणजे, त्यात तरंगणारं तूप आणि मसाले. मला असं जेवण खाण्याची सवय आहे. उलट मराठी जेवण फारच हेल्दी असतं, ज्यामध्ये जास्त मसाले किंवा तूप नसतं. म्हणूनच मी गंमतीनं म्हणायचो की, हे गरिबांचं जेवण आहे..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :























