Kiran Mane : सातारच्या बच्चनला मिळाली नवी मालिका; 'बिग बॉस'नंतर आता पुन्हा गाजवणार छोटा पडदा
Kiran Mane : किरण माने आता एका नव्या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Kiran Mane New Marathi Serial : अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या अभिनेत्यांमध्ये किरण मानेचं (Kiran Mane) नाव घेतलं जातं. आजवर त्यांनी अनेक मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. 'बिग बॉस मराठी'चं (Bigg Boss) चौथं पर्वदेखील त्यांनी चांगलच गाजवलं आहे. सातारचा बच्चन म्हणून ते लोकप्रिय आहेत. 'मुलगी झाली हो' या मालिकेतील वादामुळे किरण माने चर्चेत आला होता. या मालिकेतून त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलेला. पण 'बिग बॉस'द्वारे त्याने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. आता किरण पुन्हा एकदा एका नव्या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे.
किरण मानेची पोस्ट काय आहे? (Kiran Mane Post)
किरण मानेने एक खास पोस्ट शेअर करत नव्या मालिकेची माहिती दिली आहे. त्याने मालिकेच्या शूटिंगदरम्यानचे फोटो शेअर करत लिहिलं आहे,"नवीन मालिका, नवी भूमिका! सहसा माझ्या वयाच्या पुरुष कलावंतांना मालिकांमध्ये फारसं काही वेगळं करायला मिळत नाही. मालिका या अभिनेत्रींभोवती फिरणाऱ्या असतात. अशा परिस्थितीतही मला आश्चर्यकारकरित्या लक्षवेधी भूमिका साकारायला मिळाल्या आहेत. ज्या प्रेक्षकांनादेखील आवडल्या".
किरण मानेने लिहिलं आहे,"माझ्या नवऱ्याची बायको'मधला राधिकाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा भाऊ शिरीषदादा... 'मुलगी झाली हो'मधला तुफान गाजलेला रांगडा, हळवा, अॅंग्री यंग मॅन' विलास पाटील अशा परस्परविरोधी धाटणीच्या भूमिका करायला मिळणं हे माझ्यामधल्या अभिनेत्याला सुखावणारं होतं. विशेष म्हणजे दोन्ही मालिकांनी टीआरपीचे रेकॉर्डब्रेक उच्चांक गाठले होते".
View this post on Instagram
किरण मानेने पुढे लिहिलं आहे,"आता मी छोट्या पडद्यावर आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा खूप वेगळा माणूस साकारत आहे. तुम्ही याआधी मला अशा रोलमध्ये इमॅजिनही केलं नसेल, शूटिंगला नुकतीच सुरुवात झाली आहे. खूप मजा येत आहे. शूटिंगला नुकतीच सुरुवात झाली आहे. खूप मजा येत आहे. कुठल्या वाहिनीवर, कधीपासून आणि किती वाजता याबद्दल लवकरच कळवेन".
किरण मानेची पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. या पोस्टवर चाहते कमेंट्स करत नव्या मालिकेसाठी शुभेच्छा देत आहेत. किरण माने नक्की कोणत्या मालिकेत झळकणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. विषय ग्रामीण भागातला दिसतोय, अभिनंदन, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
संबंधित बातम्या