Sony Marathi : सोनी मराठीवरील 'गाथा नवनाथांची' मालिकेचे 100 भाग पूर्ण
Gatha Navnathanchi : टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच सोनी मराठी ही मालिका घेऊन आली आहे.
Gatha Navnathanchi 100 Episode : सोनी मराठी वाहिनी नेहमीच वेगवेगळ्या कथानकाचे उत्तम सादरीकरण घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. सोनी मराठी नवनवीन प्रयोग करत असते. मग त्यात मालिकेतील कथानकांचा अभ्यास असो, मालिकांतील कलाकारांची निवड करणे असो वा दिग्दर्शक, निर्मितीसंस्था घेत असलेली मेहनत असो. त्यामुळे वाहिनी मालिकेत करत असलेले प्रयोग देखील यशस्वी होत असतात.
'गाथा नवनाथांची' या लोकप्रिय मालिकेचे 100 भाग पूर्ण झाले आहेत. टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच सोनी मराठी ही मालिका घेऊन आली आहे. पण हा वेगळा प्रयोग मात्र जनसामान्यांत लोकप्रिय झाला आहे. नवनाथांच्या जन्माच्या आणि त्यांच्या कार्याच्या कथा दृष्य स्वरूपात कधीही न पाहिलेल्या या मालिकेत दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
मालिकेत आतापर्यंत माश्याच्या पोटातून आलेले मच्छिंद्रनाथ, गोरक्षेतून अवतरलेले गोरक्षनाथ, मातीतून अवतरलेले गहिनीनाथ आणि अग्निकुंडातून अवतरलेले जालिंदरनाथांनी त्यांच्या कार्याला प्रारंभ केल्याचं आतापर्यंत दाखविण्यात आले आहे.
मालिका आता एका रंजक टप्प्यावर पोहोचली आहे. मच्छींद्रनाथ एका मोठ्या संकटात अडकणार असल्याचे प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. हनुमानाला सीतामाईने दिलेलं लग्नाचं वचन पूर्ण करण्याची जबाबदारी मच्छींद्रनाथांवर येते आणि त्यांना स्त्री राज्यात प्रवेश करावा लागतो. तिथे त्यांची भेट राणी मैनावतीसोबत होते. मच्छींद्रनाथ वचन पूर्ण करू शकतील का तसेच येणाऱ्या संकटातून ते कसे सुटतील हे येणाऱ्या भागांत पाहायला मिळणार आहे.
मैनावतीच्या भूमिकेत प्रतीक्षा जाधव दिसून येणार आहे.स्री राज्याच्या या कथेसाठी मोठ्या सेटची उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना भव्य स्वरूपातल्या दृश्यांची मेजवानी मिळणार आहे. या भव्यदिव्य सेटची निर्मिती सतीश पांचाळने केली आहे. तर मालिकेची निर्मिती आणि लेखन संतोष अयाचितने केले आहे. या मालिकेमुळे नवनाथांचा महिमा घराघरात पोहचत आहे.
ज्ञानेश्वर माऊली मालिकेनंतर सोनी मराठी वाहिनी "कुसुम" ही नवी मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. "कुसुम" मालिका आताच्या काळातील मुली आणि स्त्रियांचं प्रतिनिधित्व करणार आहे. ज्या मुलींना आपल्या कुटुंबासाठी काही करायचं आहे अशा सर्व मुलींसाठी ही मालिका प्रेरणा देणारी ठरणार आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली होती, मुक्ताईने माऊलींच्या पाठीवर मांडे कसे भाजले अशा अनेक गोष्टी लहानपणापासून ऐकायला मिळत असतात. त्या सर्व गोष्टी ज्ञानेश्वर माऊली मालिकेतील प्रोमो व्हिडीओमधून दिसून आल्या आहेत. त्यामुळे आता ग्राफिक्स, स्पशेल इफेक्ट, अत्याधुणीक तंत्रज्ञानाचा सर्वाधिक वापर करत ही मालिकाप्रेक्षकांच्या पसंतीस पडणार आहे.