एक्स्प्लोर
अग्निहोत्र 2 मालिका गाशा गुंडाळणार!
गेल्या अनेक दिवसांपासून अग्निहोत्र बंद होणार असल्याची चर्चा टीव्ही वर्तुळात होती. पण आता स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेचे प्रोमो आणि वेळ पाहता अग्नहोत्र येत्या काही दिवसांत गाशा गुंडाळणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. या मालिकेच्या जागी आता वैजू नंबर १ ही मालिका मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून येते आहे.
मुंबई : स्टार प्रवाहवरील अग्निहोत्र 2 ही मालिका लवकरच गाशा गुंडाळणार असल्याची माहिती आहे. स्टार प्रवाहवर गेल्या दोन महिन्यांपासून अग्निहोत्र 2 ही मालिका सुरु झाली. अग्निहोत्र या मालिकेची लोकप्रियता कॅश करण्यासाठी चॅनलने ही नवी गोष्ट छोट्या पडद्यावर आणली. 2 डिसेंबरपासून ही मालिका सुरु झाली. मालिकेच्या टीजरला कमाल प्रतिसाद मिळाला, शरद पोंक्षे, रश्मी अनपट, राजन भिसे आदी कलाकारांचा चोख अभिनय ही या मालिकेची जमेची बाजू होतीच. पण मालिका सुरु होऊन अवघे दोन महिने उलटत नाहीत तोच चॅनलने ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं समजतं.
आजही अग्निहोत्र मालिकेविषयी आणि मालिकेतल्या पात्रांविषयी प्रेक्षकांमध्ये जिव्हाळा आहे. पहिल्या पर्वातलं अग्निहोत्री कुटुंब आणि आठ गणपतींच्या रहस्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. 'अग्निहोत्र 2' मध्ये नव्या पीढीची नवी गोष्ट आणि सप्तमातृकांचं रहस्य उलगडणार होतं. या सप्तमातृकांच्या रुपात सात अभिनेत्री दिसणार होत्या. या सात अभिनेत्रींपैकी एक अक्षरा म्हणजेच रश्मी अनपट होती. पहिल्या पर्वात महादेव अग्निहोत्रींची भूमिका अभिनेते शरद पोंक्षे यांनी साकारली होती. आजारावर मात करत 'अग्निहोत्र 2' मध्येही शरद पोंक्षे त्यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी सज्ज होते. अग्निहोत्र 1 चे दिग्दर्शन अभिनेते-दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी केलं होतं. 'अग्निहोत्र 2'ची कथा श्रीरंग गोडबोले यांची होती तर भीमराव मुडे या मालिकेचं दिग्दर्शन करत होते.
अग्निहोत्रचा प्रवास नव्याने सुरु होणार, 'अग्निहोत्र 2'चा टीझर रिलीज
सध्या या मालिकेचं शूटिंग मुंबईजवळ सुरु आहे. अजून याचं शूट थांबलेलं नाही. पण मिळालेल्या माहितीनुसार ही मालिका गुंडाळली जात असल्याची कल्पना मालिकेच्या कलाकारांनाही देण्यात आली आहे. येत्या काळात या मालिकेच्या जागी 'वैजू नंबर 1' ही मालिका सुरु होणार आहे. या मालिकेची गोष्टच संपल्यामुळे ही मालिका बंद करत असल्याचं कारण पुढे केलं जात आहे. पण कोणतीही मालिका अशी दोन महिन्यांत बंद होत नाही. अचानक हा निर्णय झाल्याने मात्र सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. मालिकेचा एकूण खर्च आणि टीआरपीचं गणित न जमल्यामुळे चॅनलला जवळपास 50 लाखांचं नुकसान सोसावं लागल्याचं कळतं. अर्थात हा अधिकृत आकडा नाही. चॅनलकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. पण टीव्ही वर्तुळात मात्र अग्निहोत्र 2 बंद होत असल्याच्या चर्चेने अनेकांना हुरहूर लागली आहे. पण एव्हाना 'वैजू नंबर 1'चे प्रोमो टीव्हीवर दिसूही लागले आहेत. त्यांची वेळ पाहता अग्निहोत्र लवकरच बंद होणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. स्टार प्रवाहच्या फेसबुक पेजनुसार 9 मार्चपासून ही मालिका रात्री 10 वाजता दाखवली जाणार आहे. त्यामुळे अग्निहोत्री कुटुंबीय आणखी जेमतेम 10-12 दिवस प्रत्येक घरात साथीला असणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
ऑटो
Advertisement