गायिका वैशाली माडे करणार राष्ट्रवादीत प्रवेश, 31 मार्चला मुंबईतील पक्ष कार्यालयात होणार प्रवेश सोहळा
वैशाली यांच्या प्रवेशाच्या माध्यमातून विदर्भातील कलाकारांना पक्षाशी जोडण्याचा राष्ट्रवादीचा मानस असल्याची माहिती राष्ट्रवादीतील सूत्रांनी दिली आहे.
अकोला : सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडे आता राष्ट्रवादीत 'पिंगा' घालणार आहेत. वैशाली माडे या 31 मार्चला मुंबईतील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेणार आहेत. दुपारी 12 वाजता हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. यावेळी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट, कला, साहित्य आणि सांस्कृतिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी 'एबीपी माझा' ही माहिती दिलीय. वैशाली माडे यांनीही या बातमीला दुजोरा दिला आहे.
सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडे या वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटच्या आहेत. एका सर्वसामान्य घरातील मुलगी ते चित्रपट सृष्टीतील नामवंत गायिका हा वैशाली यांचा प्रवास अतिशय संघर्षाचा आहे. 'झी' वरील मराठी आणि हिंदी अशा दोन्ही स्पर्धांचं विजेतेपद पटकावल्यानं वैशाली यांचे महाराष्ट्रासह देशभरात चाहते आहेत. वैशाली यांच्या प्रवेशाच्या माध्यमातून विदर्भातील कलाकारांना पक्षाशी जोडण्याचा राष्ट्रवादीचा मानस असल्याची माहिती राष्ट्रवादीतील सूत्रांनी दिली आहे.
कोण आहेत वैशाली म्हाडे :
वैशाली माडे यांचा एका सुप्रसिद्ध गायिकेपर्यंतचा प्रवास मोठ्या संघर्षासह अनेक चढ-उतारांचा राहिला आहे. त्यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील खार तळेगाव येथे झाला आहे. त्यांचं माहेरचं नाव वैशाली भैसने. बालपणी गरिबीमुळे त्यांना अनेक हाल-अपेष्टा सहन कराव्या लागल्यात. मात्र, याही परिस्थितीत त्यांनी त्यांच्यातील गायिका जिवंत ठेवली. पुढे त्यांचं लग्न वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटचे अनंत माडे यांच्याशी झालं. त्यांच्या या प्रवासात त्यांच्या पतीचाही मोठा वाटा आहे.
'सारेगमप'नं बदलवलं आयुष्य:
वैशाली माडे या 2008 मध्ये 'झी मराठी'च्या मराठी 'सा रे ग म प'च्या पर्वाच्या विजेत्या ठरल्यात. हाच त्यांच्या आयुष्याचा 'टर्निंग पाँईंट' ठरला. येथून पुढे 2009 मध्ये त्यांनी 'झी'च्या हिंदी 'सा रे ग म प'मध्ये आपलं नशिब आजमावलं. यात त्या सौमेन नंदी, यशिता यशपाल यांच्यासह 'टॉप थ्री'मध्ये पोहोचल्यात. पुढे आपल्या जादूई आवाजाच्या बळावर त्यांनी 'सा रे ग म प' च्या हिंदी पर्वातही बाजी मारत संगीत जगताला आपल्या अस्तित्व आणि कर्तृत्वाची जाणीव करून दिली. पुढे यानंतर त्यांना मागे वळून पहावंच लागलं नाही.
अनेक हिंदी, मराठी गीतांनी दिली नवी ओळख :
गेल्या दशकभरात अनेक हिंदी-मराठी गाण्यांतून त्यांनी आपला आवाज अजरामर केला आहे. त्यातील काही महत्वाचे चित्रपट खालीलप्रमाणे आहेत. याशिवाय अनेक मराठी मालिकांची 'टायटल साँग' म्हाडे यांनी गायिली आहेत. यामध्ये 'झी मराठी'वरील 'कुलवधू', 'होणार सुन मी या घरची', 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकांचा समावेश आहे.
वैशाली माडेंनी गाणे गायलेले चित्रपट :
मराठी चित्रपट :
इरादा पक्का (2010)
मध्यमवर्ग (2014)
हंटर (2015)
कॅरी ऑन (2015)
31 दिवस (2018)
रणांगण (2018)
आटपाडी नाईट्स (2019)
हिंदी चित्रपट :
दमादम्म (2011)
बाजीराव मस्तानी : (2015)
अंग्रेजी में कहते है : (2017)
कलंक : (2019)
पुरस्कार :
वैशाली म्हाडे यांना त्यांच्या गीतांसाठी अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले. तर अनेक नामवंत पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आलं आहे.
पुरस्कार :
1) स्क्रीन अवॉर्ड : चित्रपट - कलंक, वर्ष - 2019, गीत - घर म्होरे परदेसीया. (श्रेया घोषालसह)
2) झी सिने अवॉर्ड : चित्रपट - कलंक, वर्ष - 2020, गीत - घर म्होरे परदेसीया. (श्रेया घोषालसह)
नामांकन :
1) 'मिर्ची म्युझिक अवॉर्ड : चित्रपट - 'बाजीराव मस्तानी' : वर्ष - 2015, गीत - पिंगा (श्रेया घोषालसह)
2) फिल्मफेअर अवॉर्ड : चित्रपट - कलंक, वर्ष - 2020, गीत - घर म्होरे परदेसीया. (श्रेया घोषालसह)
राजकीय 'इनिंग'साठी राष्ट्रवादीचीच निवड का? :
गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादीनं आपली चित्रपट आणि सांस्कृतिक आघाडी अधिक सक्षम करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू केले आहेत. या आघाडीच्या माध्यमातून जनमाणसात अधिक ताकदीने जाण्याचा राष्ट्रवादीचा मानस आहे. माडे या पक्षाचं संघटन काहीसं कमकुवत असलेल्या विदर्भाचं प्रतिनिधित्व करतात. शिवाय त्यांची पार्श्वभूमी ही संघर्ष आणि वंचित समाजातील असल्याने येथे पुढे काम करण्यास स्कोप मिळू शकतो. गेल्या अनेक दिवसांत अनेक दिग्गज मराठी कलाकारांनी राष्ट्रवादीच्या चित्रपट आघाडीत प्रवेश केला आहे. माडे यांनी प्रवेश करावा यासाठी दोन ते तीन महिन्यांपासून प्रयत्न सुरू होते. अखेरीस माडे यांच्या होकारानं आता त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार असल्याचं स्पष्ट आहे.