Pune News: 'राज ठाकरेंच्या आवाजात दम, पण त्यांच्या पाठीशी कोणी नसतं…'; पुण्याच्या आजीबाईंनी मनसेच्या भळभळत्या जखमेवरची खपली काढली
Pune News: खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे टीव्ही सीरियलमधल्या जाहिराती कमी करा, अशी गंमतीशीर मागणी करणाऱ्या आजीबाईंचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला.

Pune News: एखादा राजकारणी (Political News Updates) दौऱ्यावर आला की, त्याला आपल्या समस्या सांगण्यासाठी नागरिकांची झुंबड उडते. मग आसपासच्या परिसरातील, रस्ते, लाईट, पाणी, वीज यांसारख्या समस्या राजकारण्याच्या कानावर घालून, त्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी विनंती केली जाते. अशाच एका आजीबाईंनी आगळी-वेगळी समस्या राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामतीच्या खासदार सुप्रीया सुळेंकडे केलेली. आजीबाईंची तक्रार ऐकून सुप्रीया सुळेंनाही हसू आवरता आलं नव्हतं. विशेष म्हणजे, सुप्रीया सुळेंनी आजीबाईंची तक्रार ऐकून घेतली आणि तुमच्या मागणीचा विचार नक्की करते, असं आश्वासनही आजीबाईंना दिलं आहे. सुप्रीया सुळेंकडे अगदी निरागसपणे आपली तक्रार मांडणाऱ्या आजीबाईंशी एबीपी माझानं बातचित केलीय.
खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे टीव्ही सीरियलमधल्या जाहिराती कमी करा, अशी गंमतीशीर मागणी करणाऱ्या आजीबाईंचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला. त्याच आजींसोबत एबीपी माझानं बातचित केली आहे. कुसुम घोडके असं या आजींचं नाव असून त्यांचं वय 80 वर्ष आहे.
दिवस रिकामा जातो म्हातारपणी करायचं काय??? तर मालिका बघायच्या… मात्र याच मालिकांच्या ब्रेकमध्ये जाहिराती दाखवतात... मग त्या जाहिराती का बघायच्या? त्यावर तोडगा काढा, अशी आगळी-वेगळी मागणी आजींनी सुप्रीया सुळेंकडे अगदी निरागसपणे केलेली. आता मालिकांमध्ये हेवे-दावे दाखवतात, ते आधी बंद करा... कुरघोडी करणारे व्हिलन दाखवता, ते सुद्धा बंद करा, असं म्हणत आजीनं थेट मालिकांच्या दिग्दर्शकांना आणि प्रोड्यूसर्सना खडसावलं आहे.
कुसुम घोडके आजींना तुमचा आवडता राजकारणी कोण? हे विचारल्यावर त्यांनी थेट माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरूंचं नाव घेतलं आहे. तसेच, आताच्या राजकारण्यांबद्दल बोलताना राज ठाकरेंच्या नावाचा उल्लेख केला आहे. राज ठाकरेंच्या आवाजात दम आहे पण त्यांच्या पाठीशी कोणी नसतं…, असं म्हणत आजींनी राज ठाकरेंबाबतदेखील मत व्यक्त केलं आहे.
आजींनी सुप्रीय सुळेंकडे काय मागणी केलेली?
आजीबाई म्हणालेल्या की, "माझी एक तक्रार आहे... आम्ही म्हातारी माणसं घरी टीव्ही बघतो. एवढे पैसे भरायचे आणि जाहिरातीच पाहत बसायच्या. काय बघायचं सांगा? दहा मिनिटांचा कार्यक्रम असतो. बाकीची वीस मिनिटं जाहिरातीच. कुठे तक्रार करु हेच मला समजेना..."
आजीबाई पुढे बोलताना सुप्रीया सुळेंना म्हणाल्या की, "योगायोगाने तुम्ही आलात, त्यामुळे मला जरा बरं वाटलं, त्याच्यावर तुम्हाला काहीतरी करता आलं तर बघा. थोडी मेहरबानी होईल. कारण आमचा वेळ जात नाही. नुसता वैताग आणलाय. खरंच सांगते... एक जाहिरात तर दोन दोन वेळा दाखवतात..." यावर सुप्रीया सुळेंनी आजीबाईंची संपूर्ण तक्रार ऐकून घेतली आणि त्यांना त्यांच्या तक्रारीचं निवारण करण्याचं आश्वासन देऊन तिथून निघाल्या. पण, आता त्या आजीबाईंची तक्रार कशी सोडवणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
पाहा व्हिडीओ :
महत्त्वाच्या इतर बातम्या :























