Pune Old Lady On Supriya Sule: 'टीव्हीवर दहा मिनिटांचा कार्यक्रम, बाकीची वीस मिनिटं जाहिरातीच...'; पुण्यातील आजीबाईंची सुप्रिया सुळेंकडे तक्रार
Pune Old Lady On Supriya Sule: सुप्रीया सुळेंनी आजीबाईंची तक्रार ऐकून घेतली आणि तुमच्या मागणीचा विचार नक्की करते, असं आश्वासनही आजीबाईंना दिलं आहे.

Pune Old Lady On Supriya Sule: अनेकदा राजकारणी शहरातील, गावा-खेड्यांतील काही भागांचे दौरे करतात, तिथली माणसं, रहिवाशी आपापल्या समस्या त्यांच्यासमोर मांडतात. वीज, रस्ते,पाणी, कचऱ्याचं व्यवस्थाप यांसारख्या अनेक समस्यांबाबतची गाऱ्हाणी अनेकजण राजकारण्यांपर्यंत पोहोचवून सोडवण्याचा प्रयत्न करतात. पण, एक आगळी-वेगळी समस्या पुण्यातल्या एका वृद्ध महिलेनं थेट खासदारांकडे मांडली आहे. आजीबाईंनी आपली समस्या थेट राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामतीच्या खासदार सुप्रीया सुळे यांच्याकडे केली आहे. विशेष म्हणजे, सुप्रीया सुळेंनी आजीबाईंची तक्रार ऐकून घेतली आणि तुमच्या मागणीचा विचार नक्की करते, असं आश्वासनही आजीबाईंना दिलं आहे.
महाराष्ट्र टाईम्सनं त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक आजीबाई आपली तक्रार सुप्रीया सुळेंना सांगताना दिसत आहेत. आजीबाई म्हणतात की, "माझी एक तक्रार आहे... आम्ही म्हातारी माणसं घरी टीव्ही बघतो. एवढे पैसे भरायचे आणि जाहिरातीच पाहत बसायच्या. काय बघायचं सांगा? दहा मिनिटांचा कार्यक्रम असतो. बाकीची वीस मिनिटं जाहिरातीच. कुठे तक्रार करु हेच मला समजेना..."
आजीबाई पुढे बोलताना सुप्रीया सुळेंना म्हणाल्या की, "योगायोगाने तुम्ही आलात, त्यामुळे मला जरा बरं वाटलं, त्याच्यावर तुम्हाला काहीतरी करता आलं तर बघा. थोडी मेहरबानी होईल. कारण आमचा वेळ जात नाही. नुसता वैताग आणलाय. खरंच सांगते... एक जाहिरात तर दोन दोन वेळा दाखवतात..." यावर सुप्रीया सुळेंनी आजीबाईंची संपूर्ण तक्रार ऐकून घेतली आणि त्यांना त्यांच्या तक्रारीचं निवारण करण्याचं आश्वासन देऊन तिथून निघाल्या. पण, आता त्या आजीबाईंची तक्रार कशी सोडवणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
























