आम्ही आता पूर्वीसारखे तरुण नाहीत...‘3 इडियट्स’चा सीक्वलच्या अफवांवर आर. माधवनने सांगितलं खरं कारण
दिग्दर्शक राजकुमार हिरानी ‘3 इडियट्स 2’ वर काम करत असल्याच्या बातम्या समोर येत होत्या.

3 ideots sequel: 2009 मध्ये प्रदर्शित झालेला सुपरहिट चित्रपट ‘3 इडियट्स’ आजही प्रेक्षकांच्या मनात तितकाच ताजा आहे. या चित्रपटाच्या सीक्वलविषयी गेल्या काही काळापासून जोरदार चर्चा सुरू आहे. दिग्दर्शक राजकुमार हिरानी ‘3 इडियट्स 2’ वर काम करत असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. तर आमिर खान, आर. माधवन आणि शरमन जोशी पुन्हा एकत्र झळकणार असल्याच्या अफवांनी चाहत्यांची उत्सुकता वाढवली होती. मात्र आता या चर्चांवर खुद्द आमिर खान आणि आर. माधवन यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे.
माधवन सीक्वलबाबत साशंक
बॉलीवूड हंगामासाठी सुभाष के. झा यांना दिलेल्या मुलाखतीत आर. माधवनने सीक्वलबाबत आपली शंका व्यक्त केली. तो म्हणाला की, ‘3 इडियट्स’चा सीक्वल ऐकायला छान वाटतो, पण तो थोडा विचित्रही वाटू शकतो. आमिर खान, शरमन जोशी आणि मी आता पूर्वीसारखे तरुण नाही. सीक्वलमध्ये आमची गोष्ट नेमकी कुठे नेणार? हा मोठा प्रश्न आहे. तो एक रंजक विचार असू शकतो, पण योग्य सीक्वलसाठी कदाचित हा विषय तितका योग्य नसेल. राजकुमार हिरानींसोबत पुन्हा काम करण्याची माझी इच्छा आहे, मात्र ‘3 इडियट्स’चा दुसरा भाग करणे मला थोडं अयोग्य वाटतं,’ असं माधवनने स्पष्ट केलं.
आमिर खान काय म्हणाला?
दुसरीकडे, आमिर खानने मात्र सीक्वलबाबत सकारात्मक मत व्यक्त केलं. त्याने सांगितलं की, ‘3 इडियट्स’ बनवताना सगळ्यांना खूप मजा आली होती आणि रँचो हे त्याच्या करिअरमधील सर्वात आवडतं पात्र आहे. आजही लोक रँचोबद्दल बोलतात. त्यामुळे सीक्वल करायला मला नक्कीच आवडेल. मात्र अद्याप कोणीही माझ्याशी यासंदर्भात संपर्क साधलेला नाही,’ असं आमिरने स्पष्ट केलं.
‘3 इडियट्स’चा जगभरात डंका
‘3 इडियट्स’ हा जगभरात 400 कोटींचा गल्ला जमवणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला होता. परदेशातील बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने नवा मापदंड निर्माण केला होता. अनेक वर्षे हा भारतातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट राहिला. टीव्हीवरील वारंवार प्रक्षेपण आणि ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे आजही या चित्रपटाची लोकप्रियता कायम आहे. या सिनेमात बोमन ईराणी, करीना कपूर, ओमी वैद्य आणि मोना सिंह यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. एकूणच, ‘3 इडियट्स’च्या सीक्वलबाबत सध्या तरी अधिकृत घोषणा नसली, तरी आमिर आणि माधवन यांच्या वक्तव्यांमुळे अफवांना काहीसा विराम मिळालेला दिसतो.























