Sai Pallavi : साई पल्लवीला प्रकाश राज यांचा पाठिंबा; म्हणाले, 'आम्ही तुझ्यासोबत आहोत....'
अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांनी साईला पाठिंबा देत एक ट्वीट शेअर केलं आहे.
Sai Pallavi : दक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) ही गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वक्तव्याबाबत चर्चेत आहे. एका मुलाखतीमध्ये साई पल्लवीनं काश्मिरी पंडितांबद्दल आणि मॉब लिंचिंगबाबत वक्तव्य केलं होतं. त्यानंतर एका व्हिडीओच्या माध्यमातून साईनं तिच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं. नुकतेच प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांनी साईला पाठिंबा देत एक ट्वीट शेअर केलं आहे. त्यांच्या ट्वीटची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.
साई पल्लवीनं व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओच्या माध्यमातून साईनं तिच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं. त्यानंतर प्रकाश राज यांनी एक ट्वीट शेअर केलं आहे. त्या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं, 'मानवता सर्वात आधी. साई पल्लवी,आम्ही तुझ्यासोबत आहोत'
प्रकाश राज यांचे ट्वीट:
Humanity first … we are with you @Sai_Pallavi92 https://t.co/6Zip4FJPv3
— Prakash Raj (@prakashraaj) June 19, 2022
काय म्हणाली होती साई पल्लवी?
एका मुलाखतीत हिंसा आणि धर्माच्या मुद्द्यावर बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट ‘कश्मीर फाइल्स’चा संदर्भ देताना अभिनेत्री म्हणाली होती की, ‘या चित्रपटात काश्मिरी पंडितांची त्यावेळी हत्या कशी झाली, हे दाखवण्यात आले आहे. पण, त्यापलीकडे जाऊन हिंसेला धर्माशी जोडले, तर काही दिवसांपूर्वी गायींनी भरलेला ट्रक घेऊन जाणाऱ्या एका मुस्लिम व्यक्तीलाही बेदम मारहाण करून जय श्री रामचा नारा देण्यास सांगितले. या दोन घटनांमध्ये काय फरक आहे?’
नंतर दिलं स्पष्टीकरण
साईनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये साई म्हणाली, 'माझे विचार मांडताना किंवा कोणत्याही विषयावर बोलताना मी दोनदा विचार करत आहे, ही गोष्ट पहिल्यांदाच घडली असेल. माझ्या शब्दांचा चुकीचा अर्थ लावला जाण्याची मला भीती वाटते. मी तुमच्या पर्यंत माझं मतं सांगायला उशिर केला असेल तर, मला माफ करा. एका मुलाखतीमध्ये मी एक वक्तव्य केलं. त्या वक्तव्यानंतर अनेकांकडून मला विविध प्रतिक्रिया आल्या. मला वाटतं कोणत्याही प्रकारची हिंसा ही चुकीची आहे. मला आशा आहे की असा दिवस येणार नाही, जेव्हा मूल जन्माला आल्यानंतर त्याला किंवा तिला स्वत:ची ओळख सांगण्याची भीती वाटेल. मी न्यूट्रल आहे. मी जे सांगितलं ते अनेकांनी वेगळ्या पद्धतीनं समजवून घेतलं. गेल्या काही दिवसांपासून मझ्या पाठिशी उभे राहणाऱ्या व्यक्तींचे मी आभार मानते.'
हेही वाचा: