बीड घटनेवरुन फुलवंतीचा संताप; प्राजक्ता माळीची पत्रकार परिषद; धस यांच्या टीकेला प्रत्युत्तर देणार
अभिनेत्री, लेखिका प्राजक्ता माळी यांच्याकडून आज शनिवार 28 डिसेंबर 2024 रोजी संध्याकाळी 5 वाजता मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेण्यात येत आहे
बीड : जिल्ह्यातील सरपंच हत्या प्रकरणावरुन राज्यातील वातावरण तापलं असून महायुती सरकारलाही विरोधकांकडून लक्ष्य केलं जात आहे. त्यातच, आज मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये मूक मोर्चा निघाला आहे. बीडमधील मूक मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मस्साजोग गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मस्साजोग गावचे सर्व नागरिक मोर्चात सहभागी झाले आहेत, तसेच बजरंग सोनवणे, सुरेश धस, जितेंद्र आव्हाड, छत्रपती संभाजी राजे भोसले आणि मनोज जरांगेंसह अनेक नेते या मोर्चात सहभागी झाले आहेत. डॉ. आंबेडकर चौकातून मोर्चाला सुरुवात झाली असून मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही बीडमधील मस्साजोग गावी जाऊन पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. या घटनेवरुन नेतेमंडळी सातत्याने आका म्हणत मोठ्या नेत्यांकडे बोट दाखवत आहेत. त्यातच, आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta mali), रश्मीका मंधाना आणि सपना चौधरी यांचं नाव घेऊन आणखी धुरळा उडवून दिला आहे. आता, प्राजक्ता माळीने यासंदर्भात पत्रकार परिषदेतून बाजू मांडण्याचा निर्णय घेतला आहे.
अभिनेत्री, लेखिका प्राजक्ता माळी यांच्याकडून आज शनिवार 28 डिसेंबर 2024 रोजी संध्याकाळी 5 वाजता मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेण्यात येत आहे. त्यामुळे, यासंदर्भात प्राजक्ता माळीच्या टीमने माहिती दिली असून प्राजक्ता नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण, बीड प्रकरण तापलं असून मंत्री धनंजय मुंडेचा संदर्भ देत प्राजक्ता माळीसह काही अभिनेत्रींचा उल्लेख केल्याने या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे.
दरम्यान, मनसेच्या चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी प्राजक्ता माळीच्या समर्थनार्थ बाजू घेत सुरशे धस यांना चांगलंच सुनावलं आहे. सुरेश धस, तुमच्या गलिच्छ राजकारणात आमच्या कलाक्षेत्रातील माता-भगिनींना ओढू नका. अशाप्रकारे माता-भगिनींची बदनामी करणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला बट्टा लावणारं आहे. अभिनेत्रींवर खोटेनाटे आरोप करुन हलकी प्रसिद्धी मिळवण्याचे हे प्रकार त्वरित थांबलेच पाहिजेत, असे खोपकर यांनी म्हटले. त्यानंतर, प्राजक्ता माळीकडूनही सुरेश धस यांच्याविरुद्ध महिला आयोगात तक्रार देण्यात येणार असल्याचे सांगितलं जात आहे. त्यामुळे, आजच्या पत्रकार परिषदेत प्राजक्ता माळी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जितेंद्र आव्हाडांसह अनेक आमदार, खासदारही मोर्चात
राज्यात बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन वातावरण तापलं असताना राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्याही फैरी झडताना दिसत आहेत. मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्या अटकेसाठी बीड जिल्ह्यात आज सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला असून संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करावी, आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या घटनेचा मुख्य सुत्रधार अटक करावा, अशी मागणी मोर्चेकरांनी केली आहे. या मोर्चात राष्ट्रवादीचे आमदार जितेद्र आव्हाड यांच्यासह बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते आमदार, खासदार सहभागी झाले आहेत. तसेच, मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती असून महिला वर्गाचेही प्रमाण लक्षवेधी आहे.