ज्येष्ठ नाट्यकर्मी आणि माजी नाट्य संमेलनाध्यक्ष राम 'मामा' जाधव यांचं निधन
2011 मध्ये रत्नागिरी येथे झालेल्या 91 व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते. हौशी रंगभूमीचे 'भीष्माचार्य' हरविल्याची नाट्यक्षेत्रात भावना आहे.
अकोला : अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ रंगकर्मी राम जाधव यांचं वृद्धापकाळानं निधन झालं. आज सकाळी साडे दहाच्या सुमारास त्यांनी नवी दिल्लीतील एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. 2011 मध्ये रत्नागिरी येथे झालेल्या 91 व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. मृत्यूसमयी त्यांचं वय 86 वर्ष होतंय. नाट्य आणि कलावर्तुळात राम जाधव 'मामा' नावाने प्रसिद्ध होते. मामांचं हौशी रंगभूमीसाठी मोठं योगदान आहे. मामांनी अकोल्यात 60 वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या 'रसिकाश्रय' संस्थेच्या माध्यमातून अनेक कलावत आणि नाटकं रंगभूमीला दिलीत. 'रसिकाश्रय' ही महाराष्ट्रातील सर्वात जुन्या नाट्य संस्थांपैकी एक आहे.
मामांमुळे अकोला बनलं हौशी रंगभूमीचं 'केंद्र' राम जाधव गेल्या सात दशकांपासून रंगभूमीशी जुळल्या गेलेत. अगदी लहानपणापासूनच राम जाधव यांनी रंगभूमीवर प्रवेश केला. लहान-मोठ्या भूमिका साकारत त्यांनी आपली चुणूक दाखविली. पुढे महाविद्यालयीन जीवनात देखील त्यांनी अनेक भूमिका साकारल्यात. नंतरच्या काळात त्यांनी आपले संपूर्ण आयुष्यच रंगभूमीच्या चरणी बहाल केले. रेल्वे मध्ये तिकीट कलेक्टरची नोकरी करीत असताना दुसरीकडे रंगभूमीवर मामांच्या विविध भूमिका वठविणं सुरूच होतं. राम जाधव म्हणजे मराठी नाट्यक्षेत्रातील हौशी रंगभूमीवरचं एक भारदस्त नाव. थोडे थोडके नव्हे तब्बल 50 वर्षे हे नाव राज्य नाट्यस्पर्धांमध्ये सातत्याने गाजत राहिलं. त्यातून रंगभूमीवर अकोल्याचा झेंडा डौलाने फडकत गेला. नाट्यस्पर्धेत मुंबई , पुणे व नागपूर सारख्या सर्वार्थाने पोषक वातावरण असलेल्या शहरांतील रंगकर्मीशी त्यांनी मोठा संघर्ष केला. अन अकोल्यासह विदर्भातील कलावंतांना मोठं व्यासपीठ मिळवून दिलं. प्रतिकूल परिस्थितीत आणि तुटपुंज्या साधन-सामुग्रीच्या बळावर एकनिष्ठ आणि ध्येयनिष्ठ साथीदारांच्या सहकार्याने मत्तब्बर नाट्य संस्थाना जेरीस आणणारा लढवय्या म्हणजे 'मामा' जाधव. राम जाधव म्हणजे नाट्यशास्त्राचं चालतं बोलतं विद्यापीठच होतं. 'रसिकाश्रय' नाट्यसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी अकोल्यातील अनेक नाटकं रंगभूमीवर अजरामर केलीत. मामांनी अभिनयासोबतच, दिग्दर्शन, निर्माता म्हणून देखील आपली छाप पाडली. मामांच्या कार्याची दखत घेत राज्यशासनासह विविध संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊन गौरविले. मामांनी नाट्यनिर्माते सातत्याने 150 वर नाटकांची निर्मिती राम जाधव यांनी केली होती.
राम 'मामा' अकोल्याचे सांस्कृतिक राजदुत
राम 'मामा' जाधव यांच्या 'रसिकाश्रय' नाट्यसंस्थेच्या माध्यमातून अनेक नाटकांनी राज्य नाट्य स्पर्धेत आपली चमक दाखविली. 'बाकी इतिहास', 'नाटककाराच्या शोधात सहा पात्र', 'शांतता कोर्ट चालू आहे', 'बेगम बर्वे', 'कट्यार काळजात घुसली', 'संगीत सौभद्र' अशा अनेक नाटकांनी तर अक्षरशः धमाल केली होती. मामांनी अभिनय केलेल्या 'संक्षिप्त नटसम्राट'ला रसिक-प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. 'रसिकाश्रय'च्या माध्यमातून अकोल्यातील नाट्यक्षेत्रात तीन पिढ्या घडल्यात. मामांच्या करारी आणि कठोर शिस्तीखाली तयार झालेल्या अनेकांनी पुढे नाट्यक्षेत्र गाजवलंय. रसिकाश्रय'च्या माध्यमातून या क्षेत्रात पुढे आलेल्यांमध्ये जेष्ठ नाट्यकर्मी दिलीप देशपांडे, मधु जाधव, रमेश थोरात, अरूण घाटोळ, गीताबाली उन्होणे, प्रशांत जामदार, निलेश जळमकर, अमोल ताले, श्रद्धा वरणकार अशी अनेक नावं पुढे आलीत.
नाट्यसंमेलन अध्यक्षपदाने झाला नाट्यसेवेचा सन्मान...
राम जाधव यांना त्यांच्या रंगभूमीवरील योगदानामुळे अनेक पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आलाय. मात्र, त्यांचा नाट्यसेवेचा सर्वात मोठा सन्मान केला गेला. 2011 मध्ये रत्नागिरी येथे झालेल्या 91 व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची अविरोध निवड झाली होती.हा अकोलेकरांसाठी फार मोठा सन्मान होता. यासोबतच राज्य रंगभूमी परिनिरिक्षण मंडळाचे अनेक वर्ष ते सदस्य होतेय. अगदी पाच वर्षांपूर्वी ते राज्य नाट्य परिनिरिक्षण मंडळाचे अध्यक्ष होते. करण जोहरचा वादात सापडलेला 'ए.आय.बी' या शोच्यावेळी नाट्य सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष असलेल्या वादावेळी त्यांची परखड भूमिका अतिशय चर्चेचा विषय ठरली होतीय.
अखेर मामांचा 'ते' स्वप्नं अधूरच राहिलं...
अकोल्यात गेल्या अनेक वर्षांपासून सुसज्ज अशा नाट्यगृहाची अकोलेकरांची मागणी आणि स्वप्नं आहे. त्यासाठी मामांनी अनेक वेळा सरकारशी संघर्ष केला. सरकारशी वारंवार पत्रव्यवहारही केला. 2015 मध्ये अकोल्यात सुसज्ज अशा नाट्यगृहाच्या निर्मितीला प्रारंभही झाला. मात्र, अतिशय कासवगतीने काम सुरू असलेलं हे नाट्यगृह पूर्ण झालेले मामांना अखेरच्या दिवसांमध्ये पहाता आलं नाही. तीन वर्षांपूर्वी मामा वार्धक्यामुळे हरियाणात वरिष्ठ आयपीएस अधिकारी असलेल्या मुलाकडे रहायला गेले होते. आपल्या हयातीत अकोल्याचं नाट्यगृहं सुरू व्हावं, ही त्यांची अखेरची इच्छा अकोल्यातील राजकीय इच्छाशक्तीअभावी अपूरीच राहीली. रंगभूमीच्या या 'भीष्मपितामह', 'नटसम्राटा'ला 'एबीपी माझा'ची भावपूर्ण श्रद्धांजली..