Hemlata Bane: खंडणी प्रकरणात अडकली, लावणी ते सिनेमा अनेक दिग्गजांसोबत झळकली, अटकेत असलेली हेमलता बाणे कोण?
अलीकडच्या काळात हेमलता सोशल मीडियावर सक्रिय असून, ती इन्स्टाग्रामवर रील्स आणि डान्स व्हिडिओ शेअर करताना दिसते.

Hemlata Bane: गोरेगावमधील एका बिल्डरकडून 10 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी दोन महिलांना अटक केली असून, या प्रकरणात मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आणि लावणी नृत्यांगना हेमलता बाणे हिचं नाव समोर आलं आहे. या प्रकरणाला मनोरंजनविश्वात विशेष महत्त्व मिळालं कारण हेमलता ही लोकप्रिय मालिका ‘आई कुठं काय करते’ मधील ज्येष्ठ अभिनेत्री अर्चना पाटकर यांची सून असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र अर्चना पाटकर यांनी अलीकडेच या नात्याबाबत स्पष्ट भूमिका घेत, हेमलताचा आमच्या कुटुंबाशी कोणताही संबंध नसल्याचं सांगितलं आहे. त्यांनी हेही नमूद केलं की, त्यांचा मुलगा आणि हेमलता हे गेल्या चार वर्षांपासून वेगळे असून घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
कोण आहे हेमलता बाणे?
मराठी चित्रपटसृष्टीत हेमलता बाणेने ‘लावू का लाथ’ या सिनेमातून पदार्पण केलं होतं. या चित्रपटात तिने लावणी नृत्यांगना ‘सुरेखा’ ही भूमिका साकारली होती. तिचं दमदार नृत्य, अभिनय आणि पडद्यावरील उपस्थिती प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. यानंतर तिने ‘खरं सांगू खोटं खोटं’, ‘कॅरी ऑन देशपांडे’, ‘मोहर’, ‘चल धर पकड’, ‘इवलासा खोपा’ यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं. काही मालिकांमधूनही ती छोट्या पडद्यावर झळकली होती.
चित्रपटांव्यतिरिक्त हेमलता ही एक ओळखीची लावणी डान्सर होती. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्टेज शोमध्ये तिची उपस्थिती असायची. मात्र काही वर्षांनंतर ती अचानक सिनेसृष्टीपासून दूर गेल्याचं दिसून आलं.
सोशल मीडियावर अॅक्टिव्ह
अलीकडच्या काळात हेमलता सोशल मीडियावर सक्रिय असून, ती इन्स्टाग्रामवर रील्स आणि डान्स व्हिडिओ शेअर करताना दिसते. तिने स्वतःच्या प्रोफाइलमध्ये ‘डिजिटल क्रिएटर’ असा उल्लेख केला आहे. मात्र आता खंडणी प्रकरणात अटक झाल्यानं ती पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे.
या प्रकरणात हेमलता बाणेसोबत अमरीना मॅथ्यू फर्नांडिस नावाच्या दुसऱ्या महिलेलाही अटक करण्यात आली असून, पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. एकेकाळी लावणीच्या ठेक्यावर प्रेक्षकांची दाद मिळवणारी हेमलता बाणे सध्या मात्र गंभीर आरोपांमुळे चर्चेत आहे.























