Sachin Pilgaonkar On His Memory : इतकं सगळं लक्षात कसं राहतं? सचिन पिळगावकर म्हणाले, 'माझी तल्लख बुद्धी, म्हणून सगळ्या गोष्टी लक्षात राहतात ,कधी-कधी त्रास...'
Sachin Pilgaonkar On His Memory : अनेक दशकांचा प्रवास असल्याने प्रत्येक घटना जसच्या तशी लक्षात ठेवणं अवघडच. मात्र एका मुलाखतीत सचिन पिळगावकर यांनी स्वतःच्या स्मरणशक्तीबद्दल भाष्य केलं आहे.

मुंबई: मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे अभिनेते सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) यांनी बालकलाकार म्हणून केलेल्या सुरुवातीपासून आजपर्यंत सतत अभिनयक्षेत्रात सक्रिय राहून मोठे स्थान मिळवले आहे. मराठीसोबतच बॉलिवूडमध्येही त्यांनी भक्कम ओळख निर्माण केली. कारकिर्दीत अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम करताना त्यांच्याकडे असंख्य आठवणी जमा झाल्या असून विविध मुलाखतींमध्ये ते हे अनुभव सांगत असतात. काही वेळा या त्यांच्या अनुभवामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागतं. अनेक दशकांचा प्रवास असल्याने प्रत्येक घटना जसच्या तशी लक्षात ठेवणं अवघडच. मात्र एका मुलाखतीत सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) यांनी स्वतःच्या स्मरणशक्तीबद्दल भाष्य केलं आहे.(Sachin Pilgaonkar)
Sachin Pilgaonkar On His Memory : तुम्हाला इतक्या सगळ्या गोष्टी कशा लक्षात राहतात?
अभिनेते सचिन पिळगावकर यांनी 'रेडिओ सिटी मराठी'ला नुकतीच एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीवेळी सचिन पिळगावकर यांना 'तुम्हाला इतक्या सगळ्या गोष्टी कशा लक्षात राहतात?' असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना सचिन पिळगावकर म्हणाले की, 'काय आहे ना! मी त्याच्यासोबतचं जन्माला आलोय, असं म्हणू शकतो आपण. माझी बुद्धी तल्लख आहे. ती फार चांगली गोष्ट आहे, असं नाही म्हणता येत. कारण, सगळ्याच गोष्टी लक्षात राहतात ना! त्यामुळे ना, मी खूप सहजपणे माफ करू शकतो, पण मी कधीच काहीच विसरू शकत नाही. पण ती खूपच चांगली गोष्ट आहे, असं मला वाटत नाही. कारण, त्याने त्रास पण खूप होतो. तसं बघायला गेलं तर त्याचे फायदेसुद्धा खूप आहेत. कारण, ह्या गोष्टी लक्षात राहणं आणि ते लक्षात ठेऊन त्या वेळेवर ते डोक्यात येणं, ते फार महत्वाचं आहे. त्यामुळे बऱ्याच क्षुल्लक गोष्टी लक्षात राहतात' असंही सचिन पिळगावकर यांनी पुढे सांगितलं आहे.
दरम्यान, सचिन पिळगावकर यांनी 'अशी ही बनवाबनवी', 'नवरा माझा नवसाचा', 'गंमत जंमत', 'नादिया के पार', 'बालिका वधू', 'अखियो के झारोंखो से', 'शोले' यांसारख्या गाजलेल्या मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये काम केलं आहे.
Sachin Pilgaonkar and Shriya Pilgaonkar: सचिन पिळगांवकरांचं वाक्य ऐकताच लेक श्रिया फिदीफिदी हसत सुटली
एका मुलाखतीत सचिन पिळगांवकरांनी त्यांनी त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदा विकत घेतलेल्या गाडीचा किस्सा सांगितला. अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी त्यांची लेक श्रिया पिळगांवकरसोबत (Shriya Pilgaonkar) Mashable India ला मुलाखत दिलेली. यावेळी मुलाखतीमध्ये सचिन पिळगांवकर यांनी त्यांनी त्यांच्या आयुष्यातली पहिली गाडी वयाच्या 9व्या वर्षी विकत घेतल्याचं सांगितलं. तसेच, नऊ वर्षांचे असतानाच त्यांनी ती गाडीही चालवायला शिकले, असंही ते म्हणालेत. सचिन पिळगांवकरांच्या या वक्तव्यानंतर त्यांची लेक श्रिया पिळगांवकरनं दिलेली प्रतिक्रिया सध्या जोरदार चर्चेत आहे.
मुलाखतीत बोलताना सचिन पिळगांवकर म्हणाले की, "मी 9 वर्षांचा होतो, त्यावेळी आताचा हा सी-लिंक नव्हता. मी तेव्हा टायकल वाडी इथे राहायचो. टायकलवाडी शिवाजी पार्क इथे येतं. मी 9 वर्षांचा होतो, तेव्हा मी पहिली गाडी खरेदी केली. तिल मॉरिस माइनर बेबी हिंदुस्थान म्हणायचे. या गाडीला बकेट सीट आणि फ्लोअर शिफ्ट गिअर होते. ही पेट्रोलवर धावणारी गाडी होती".
यावेळी मुलाखतकारनं सचिन यांना विचारलं की, "तुम्ही ती गाडी चालवायचे कशी?" तर सचिन पिळगांवकर म्हणाले की, "नाही ड्रायव्हर होता. पण, मी 9 वर्षांचा असताना, याच वरळी सीफेसवर त्या गाडीमधून गाडी चालवायला शिकलो..." सचिन पिळगांवकरांनी फक्त नऊ वर्षांचे असताना गाडी खरेदी केल्याचं ऐकून मुलाखतकाराला धक्का बसलाच. पण, मुलाखतीत सचिन पिळगांवकरांसोबत उपस्थित असलेली त्यांची लेक श्रिया पिळगांवकरलाही धक्का बसला. बरं श्रियानं तिच्या वडिलांचा किस्सा ऐकला आणि तिला धक्का तर बसलाच, पण मुलाखतीत हसूही आवरता आलं नाही. श्रिया वडिलांनी सांगितलेला किस्सा ऐकून ऑन कॅमेरा फिदीफिदी हसली.





















