खऱ्या आयुष्यातही गुंडगिरी करायचा तेजाब सिनेमातील 'लोटिया पठाण', एका मुलाखतीने आयुष्य बदललं अन् बनला बॉलिवूडचा व्हिलन!
Kiran Kumar famous villain : खऱ्या आयुष्यातही गुंडगिरी करायचा तेजाब सिनेमातील 'लोटिया पठाण', एका मुलाखतीने आयुष्य बदललं अन् बनला बॉलिवूडचा व्हिलन!

Kiran Kumar famous villain : टीव्ही आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा किरण कुमार हे प्रसिद्ध कॅरेक्टर आर्टिस्ट जीवन कुमार यांचे सुपुत्र आहेत. कश्मिरी पंडित घराण्यातील किरण कुमार यांनी केवळ हिंदीच नव्हे तर भोजपुरी, गुजराती चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाचे कौशल्य दाखवले आहे. 1971 साली ‘दो बूंद पानी’ या चित्रपटातून त्यांनी अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांचा जीवनप्रवास आणि चित्रपट मिळाल्याची कथा एखाद्या चित्रपटापेक्षाही जास्त रंजक आहे.
पडद्यावर सकारात्मक आणि नकारात्मक अशा सर्व प्रकारच्या भूमिका त्यांनी साकारल्या आहेत. टीव्ही आणि ओटीटीवरही किरण कुमार सातत्याने झळकलेले पाहायला मिळाले आहेत. लहानपणापासूनच किरण खट्याळ होते. जास्त लाडामुळे ते थोडे बिघडले होते. मुलाच्या खोड्यांमुळे वैतागून वडील जीवन कुमार यांनी त्यांना बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवले. प्रवेश घेताना वडिलांनी शाळेबाहेर लावलेला एक फलक दाखवला आणि सांगितले – “इथे हुशार विद्यार्थ्यांची नावे लिहिली जातात, तुझं नावही इथे असलं पाहिजे.” अभ्यासात ते फारसे हुशार नव्हते, पण क्रिकेट आणि नाटकांमुळे शाळेत लोकप्रिय झाले आणि अखेर शाळेच्या बोर्डावर आपले नाव कोरले.
FTII मधील भांडण आणि कॉलेजमधून हकालपट्टी
शालेय शिक्षण पूर्ण करून परत आल्यावर वडिलांनी त्यांची भेट नुकतेच एफटीआयआयमधून बाहेर पडलेल्या अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांच्याशी करून दिली. किरण यांनी आपल्या अभिनयाची आवड सांगितली. शत्रुघ्न सिन्हा यांच्या सल्ल्याने किरण एफटीआयआयमध्ये दाखल झाले. सुरुवातीला सर्व ठीक चालू होते, पण एकदा गोंधळ उडाला. अभिनय विभागातील विद्यार्थ्यांचा दिग्दर्शन विभागातील विद्यार्थ्यांशी वाद झाला. भांडण हातघाईवर गेले आणि परिस्थिती नियंत्रणा बाहेर गेली आणि पोलिसांना बोलवावे लागले. त्यानंतर किरण कुमारसह चार विद्यार्थ्यांना कॉलेजमधून काढून टाकण्यात आले. या निर्णयामुळे अभिनय विभागातील विद्यार्थी संतप्त झाले, कारण भांडण दिग्दर्शन विभागानेही केले होते, मग त्यांना का काढले नाही?
ख्वाजा अहमद अब्बास यांनी बनवला हिरो
कॉलेजच्या या निर्णयाविरोधात विद्यार्थी आंदोलनासाठी बसले. सांगितले जाते की तब्बल 45 दिवस कॉलेज बंद राहिले. शेवटी प्रकरण सोडवण्यासाठी एक समिती नेमण्यात आली. प्रसिद्ध चित्रपट निर्माते ख्वाजा अहमद अब्बास हे त्या समितीचा भाग होते. ते कॉलेजला आले आणि त्यांनी किरणला ओळखले. अहमद अब्बास म्हणाले – “तुझे वडील इतके सज्जन आहेत, आणि तू गुंडगिरी करतोस!” त्यांनी झापलं आणि मग सांगितलं – “उद्या माझ्या गेस्ट हाऊसला भेटायला ये.” घाबरलेल्या किरणने दुसऱ्या दिवशी हजेरी लावली, तर अब्बास साहेब म्हणाले – “मी ‘दो बूंद पानी’ हा चित्रपट बनवत आहे. त्यात मला एक लांबट इंजिनिअरची भूमिका हवी आहे. तुला करायची आहे का?” किरणना जिथे झापडण्याची अपेक्षा होती, तिथे त्यांना थेट चित्रपटाची ऑफर मिळाली. आणि त्यानंतरच किरण कुमार हे इंडस्ट्रीत लोकप्रिय अभिनेता बनले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
आमिर खानसोबत लगान सिनेमात झळकलेली अभिनेत्री कुठे गायब? वयाची 44 वर्षे उलटली तरीही अविवाहित
आईचा शेवटचा फोन उचलू शकला नाही किकू शारदा, आईच्या आठवणीत भावूक; हुंदका आवरेना























