Govinda : धैर्यशील मानेंच्या निवडणूक प्रचारात गोविंदा उतरला, सभेत केलं हिंदी-मराठीत भाषण
Govinda : गोविंदाने नुकताच शिंदे गटात प्रवेश केला असून आता तो निवडणूक प्रचारांमध्येही व्यस्त असल्याचं पाहायला मिळतंय.
Govinda : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील (Hatkanangle LokSabha Constituency) महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांच्या निवडणूक प्रचारात अभिनेते गोविंदा (Govinda) उतरलाय. आष्टा येथे अभिनेते गोविंदाच्या प्रमुख उपस्थितीत सभा पार पडली. या सभेत गोविंदाने हिंदी आणि मराठीत भाषण करत उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. सध्याच्या लोकसभेच्या वातावरणातच गोविंदाने नुकतच मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर गोविंदा हा शिंदे गटाच्या उमेदवारांच्या प्रचारात व्यस्त असल्याचं पाहायला मिळतंय.
तसेच या सभेदरम्यान गोविंदाने व्यासपीठावर डान्स देखील केला.त्याच्या या डान्समुळेही सभा चांगलीच गाजली. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाकडून धैर्यशील माने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारासाठी गोविंदा कोल्हापुरात दाखल झाला. या सभेतील त्याच्या भाषणाने विशेष लक्ष वेधून घेतलं
गोविंदाचं भाषण
यावेळी गोविंदाने मराठी आणि हिंदीमध्ये भाषण केलं. गावच्या गावे पैलवानकी असणारा हा सगळा आपला भाग आहे. पैलवानांना डावाबद्दल जास्त काही सांगावे लागत नाही. पैलवानाना कोणता डाव टाकून कसे विजयी व्हायचे हे माहीत असते. त्यामुळे या लोकभेच्या निवडणूक डावात आपण योग्य डाव टाकून धैयशील माने यांना निवडून आणाल असा मला विश्वास आहे असे गोविदाने म्हंटलेय.
गोविंदाचा पक्षप्रवेश
अभिनेता गोविंदा अहुजा (Actor Govinda) याने शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर गोविंदाला मुंबईतील वायव्य मुंबईतून (North West Mumbai Lok Sabha Election) उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा आहेत.अभिनेता गोविंदा याने 2004 साली उत्तर मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी भाजपच्या राम नाईकांचा पराभव केला होता. गोविंदाची प्रसिद्धी लक्षात घेता त्याला तिकीट देऊन काँग्रेसने भाजपचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला होता. नंतरच्या काळात गोविंदाने राजकारणाला रामराम करत पुन्हा एकदा अभिनयाकडे मोर्चा वळवला. पण आता पुन्हा एकदा त्याने राजकारणात एन्ट्री केलीय.
हातकणंगलेमध्ये चौरंगी लढत
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात चौरंगी लढत पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाने सत्यजीत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून धैर्यशील माने पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. याशिवाय राजू शेट्टी यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलाय. तर वंचित बहुजन आघाडीने कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डी. सी. पाटील यांना हातकणंगलेत उमेदवारी दिली आहे. प्रकाश आवाडे यांनी निवडणुकीत माघार घेतल्यानंतर हातकणंगलेमध्ये पंचरंगी लढत चौरंगी लढतीवर आली आहे.