Ashvini Mahangade : मराठी अभिनेत्रीने साताऱ्याच्या सभेत तुतारी हाती धरली,मराठा आरक्षण,शेतकरी प्रश्न; शरद पवारांसमोर कसलेल्या राजकारण्याप्रमाणे ठोकलं भाषण
Ashvini Mahangade : अभिनेत्री अश्विनी महांगडे हीने शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये साताऱ्याच्या सभेत केलेलं भाषण चांगलच गाजलं आहे.
Ashvini Mahangade : लोकसभा निवडणुकांच्या वातावरणात अनेक कलाकार मंडळी त्यांच्या राजकीय कारकीर्दीला देखील सुरुवात करत असल्याचं पाहायला मिळतंय. अभिनेत्री कंगना रणौत हिला मंडीतून तिकीट मिळालं, गोविंदाने काही दिवसांपू्र्वी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर आता आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची (Sharad Pawar Group) तुतारी हाती घेतली आहे. अभिनेत्री अश्विनी महांगडे (Ashwini Mahangade) हीने केलेल्या भाषणाने साताऱ्याची सभा गाजवली.
स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री अश्विनी महागंडे ही अनेक कारणांमुळे कायमच चर्चेत राहिली. त्याचप्रमाणे तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे ती राजकारणात प्रवेश करणार या चर्चांना देखील उधाण आलं होतं. पण आता अश्विनीने अधिकृतरित्या शरद पवारांच्या पक्षाच्या झेंडा हाती घेतल्याचं जाहीर केलं आहे. दरम्यान यावेळी अश्विनीने शशिकांत शिंदेंसाठी केलेल्या भाषणाची जोरदार चर्चा रंगू लागलीये. या भाषणात अनेक मुद्दे मांडत तिने मोदी सरकारवरही निशाणा साधाला.
'आपला उमेदवार विजयी झालेलाच आहे'
अश्विनीने तिच्या भाषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महारांजाचा जयघोष करत केली. तिने म्हटलं की, 'आज तुतारीचा आवाज ज्या पद्धतीने भिनलाय त्यावरुन मला खात्री झालेलीच आहे की आपला उमेदवार विजयी झालेलाच आहे. लढवय्यांचा सातारा, शूरवीरांचा सातारा, देशासाठी बलिदान देणाऱ्या शूरवीरांचा सातारा, कलाकारांचं माहेरघर सातारा पण इतिहासाची पानं जेव्हा जेव्हा उघडली जातील तेव्हा तेव्हा सुवर्णाक्षरांनी एकच शब्द लिहिला जाईल आणि तो वाचला जाईल ते म्हणजे निष्ठावंतांचा सातारा. अशाच साताऱ्यात पवार साहेबांनी अतिशय निष्ठावंत असा उमेदवार आम्हाला दिलेला आहे. त्यासाठी मी पवार साहेबांची आभारी आहे.'
अश्विनीने व्यासपीठावर सादर केली कविता
यावेळी भाषणादरम्यान अश्विनीने एक कविता देखील सादर केली.'एक तुतारी द्या मज आणूनी फुंकीन जी मी स्वप्रणानाने,भेदून टाकीन सगळी गगने अशी तुतारी द्या मजला आणूनी', ही कविता अश्विनीने सादर केली. पुढे तिने म्हटलं की, ही तुतारी त्याच माणासाच्या हातात दिलीये, जो अत्यंत निष्ठावंत आहे, जो पुढे जाऊन आपल्या सगळ्यांचे प्रश्न विचारणार आहे. शशिकांत शिंदेंच्या रुपाने गोरगरिबांसाठीचा एक बुलंद आवाज आपल्या सगळ्यांना लाभलेला आहे. आज शिंदे साहेबांनी हजार कामं केली आहेत, त्याची गणती मी करणार नाही. पण माझ्यासाठी माझ्या मनात भिडलेलं काम आणि मला वाटतं आज इथे जेवढी तरुण मुलं उभी आहेत, त्यांनाही निश्चित कौतुक वाटेल ते म्हणजे मराठा आरक्षणासाठी केलेलं काम. मराठा आरक्षण हे नवी मुंबईला धडकलं तेव्हा त्या आरक्षणासाठी आलेल्या प्रत्येक मुलाला, प्रत्येक माणासाला, प्रत्येक महिलेची सुखसुविधा, तिथे राहण्यासाठीची व्यवस्थित जागा, जेवणाची प्रश्न हे सगळे प्रश्न जर कोणी हिरीरीने मांडले असतील तर ते शशिकांत शिंदे यांनी मांडले.
'हा झेंडा हाती घेताना मला अतिशय अभिमान वाटतोय'
'शेतकऱ्यांना विचारतं कोण तर शेतकऱ्यांना विचारतात फक्त पवार साहेब. माझे वडील आयुष्यभर पवार साहेबांचे कार्येकर्ते म्हणून राहिले. आज त्यांचाच झेंडा हाती घेताना मला अतिशय अभिमान वाटतोय. कुठेतरी माझ्या वडिलांचं जे स्वप्न होतं, त्याच्यासाठी मी एक पाऊल टाकलंय, असं मला वाटतंय. राजकारण हे विकासाचं असायला हवं. जर असं म्हणतातय की आताचं राजकारण देशाचं आहे, आताची निवडणूक ही देशाची आहे, तर मुद्दे देखील त्याच पद्धतीने असायला हवेत. पण आज अनेक प्रश्न आहेत, ज्याची उत्तर मिळत नाहीयेत. मागील तीन वर्षात देशावरील कर्जाचा भार हा तीन पटीने वाढलाय. जेव्हा माजी पंतप्रधान मनमोहन सिंह हे पायउतार झाले तेव्हा देशावरील कर्ज हे 58.5 लक्ष कोटी इतकं होतं.पण आता जो कर्जाचा आकडा माझ्या हाती आलाय तो 155 लक्ष कोटी इतका आहे. बेरोजगारी, भ्रष्टाचार, आरक्षण शेतकऱ्याला हमीभाव असे अनेक मुद्दे आहेत आणि सांगायला अतिशय वाईट वाटतं महिला खेळाडूंच्या बाबतीत जे काही राजकारण झालं त्याने हे मन दुखावलं गेलंय. अनेक प्रश्न आहेत, त्यावर कोण बोलेल तर एकच आवाज बोलेल. त्यासाठी आपण शशिकांत शिंदे साहेबांना जास्तीत जास्त मतं देऊन विजयी करुयात', असं म्हणत अश्विनीने तिच्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली आहे.
ही बातमी वाचा :
घसा बसला तरीही शरद पवार मैदानात; ओमराजेंसाठी अजित पवारांच्या सासरवाडीत गाजवली सभा