"संयमही प्रतिशोध को काबू करने का उपाय होता है"; कंगनाच्या 'सॉफ्ट पॉर्न स्टार' टिप्पणीनंतर उर्मिला यांचं ट्वीट
मुंबईची पीओकेसोबत तुलना, ड्रग्ज कनेक्शन आणि जया बच्चन यावरु उर्मिला मातोंडकर यांनी कंगना रनौतला खडेबोल सुनावल्यानंतर, संतापलेल्या कंगनाने त्यांचा उल्लेख 'सॉफ्ट पॉर्न स्टार' असा केला. उर्मिला मातोंडकर यांनी मात्र यावर संयमी प्रतिक्रिया दिली.
मुंबई : आधी मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत, मग बॉलिवूड आणि ड्रग्ज कनेक्शन आणि आता खासदार जया बच्चन यांच्यावर केलेल्या टिप्पणीवरुन अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी कंगना रनौतवर निशाणा साधला. त्यानंतर आता संतापलेल्या कंगनाने उर्मिला मातोंडकर यांना चक्क 'सॉफ्ट पॉर्न स्टार' म्हटलं. टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत कंगनाने हे वक्तव्य केलं. यावर "संयमही प्रतिशोध को काबू करने का उपाय होता है," असं म्हणत उर्मिला मातोंडकर यांनी अतिशय संयमी प्रतिक्रिया दिली.
एका इंग्रजी चॅनलबरोबर चर्चा करताना कंगना रनौत म्हणाली की, "उर्मिला मातोंडकर यांचा एक आक्षेपार्ह इंटरव्ह्यू पाहिला. ज्याप्रकारे त्या माझ्याबद्दल बोलत आहेत, ते पूर्णत: डिवचण्यासारखं आहे. त्यांनी माझ्या संघर्षाची खिल्ली उडवली. मला भाजपकडून तिकीट हवंय, असं वाटत असल्याने त्या माझ्यावर हल्ला करत आहेत. उर्मिला मातोंडकर सॉफ्ट पॉर्न स्टार आहेत. हे जरा उर्मटपणाचं आहे, पण त्या नक्कीच त्यांच्या अभिनयासाठी ओळखली जात नव्हत्या. त्या कशासाठी ओळखल्या जायच्या, सॉफ्ट पॉर्नसाठीच ना? जर तिला तिकीट मिळू शकतं तर मला का नाही मिळणार? कोणालाही तिकीट मिळू शकतं. प्रत्येकाला तिकीट मिळू शकतं."
यावर उर्मिला मातोंडकर यांनी अतिशय संयमी प्रतिक्रिया दिली. उर्मिला मातोंडकर यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे. त्यांनी लिहिलं आहे की, "प्रतिशोध मनुष्य को जलाती रहती है, संयमही प्रतिशोध को काबू करने का उपाय होता है. शिवाजी महाराज अमर रहें."
जय महाराष्ट्र ???????? जय हिन्द ???????? शुभ रात्रि ???????? pic.twitter.com/gIK8DYibZL
— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) September 16, 2020
उर्मिला मातोंडकर यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीबद्दल कंगना रनौतवर जोरदार टीका होत आहे. कंगनाने माफी मागावी अशी मागणी केली जात आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी कंगनाचा निषेध व्यक्त करत तिला पाठिंबा देणाऱ्या भाजपने महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी असं म्हटलं आहे.
तर काँग्रेस नेत्या प्रिया दत्त यांनीही उर्मिला मातोंडकर यांना पाठिंबा दिला आहे. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना.. असं ट्वीट प्रिया दत्त यांनी केलं आहे.कंगना राणावत ने @UrmilaMatondkar जींबद्दल वापरलेल्या हीन शब्दांचा जाहीर निषेध! कंगना ला पाठिंबा देणाऱ्या भाजपाने महाराष्ट्राच्या जनतेची तात्काळ माफी मागितली पाहिजे. pic.twitter.com/MDNp9PQC4q
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 17, 2020
When People start feeling they are invincible thats when they fall the hardest. what others say doesn't really matter, when you know what you are "kucch to log Kahenge, logon ka kam hai kehna, chhodo bekaar ki batten kahin beet na jayein raina" #UrmilaMatonkar #MediaCircus
— Priya Dutt (@PriyaDutt_INC) September 17, 2020
उर्मिला यांच्याकडून जया बच्चन यांना पाठिंबा बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शनवरुन खासदार आणि अभिनेते रवी किशन यांनी भाष्य केलं होतं. त्यावरुन भडकलेल्या जया बच्चन यांनी "जिस थाली में खातें उसी में छेद करते है," असं म्हणत उत्तर दिलं होतं. यावरुनही कंगनाने जया बच्चन यांच्यावर निशाणा साधला. यावर उर्मिला म्हणाल्या की, "कंगनाचा जन्मही झाला नव्हता त्याआधी जया बच्चन यांनी उत्तम चित्रपटांमध्ये काम केलं होतं आणि त्या आपल्या काळातील उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक होत्या. ही गोष्ट दुर्दैवी आहे की, कंगना इंडस्ट्रीतील ज्येष्ठ कलाकारांसोबत अशी वागते आणि ही भारतीय संस्कृती नाही."
ड्रग्जविरुद्धची लढाई आपल्या घरापासून करायला हवी : उर्मिला मातोंडकर बॉलिवूडमध्ये असे अनेक लोक आहेत जे ड्रग्जचं सेवन करतात आणि त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी, असं कंगना रनौतने म्हटलं होतं. यावरुन उर्मिला मातोंडकर यांनी यावरही भाष्य केलं. "संपूर्ण देश ड्रग्जच्या समस्येशी झुंजत आहे. तिला माहित नाही का हिमाचल प्रदेश हा ड्रग्जचा बालेकिल्ला आहे? तिने ही लढाई आपल्या घरापासून सुरु करायला हवी," असं त्या म्हणाल्या.
उर्मिला मातोंडकरने कंगनावर निशाणा साधताना म्हटलं होतं की, "कंगना तर बॉलिवूडमधील ड्रग्ज माफियांची नावं एनसीबीला सांगण्यासाठी मुंबईत आली होती, पण तिने कोणाचंही नाव घेतलं नाही, उलट मूव्ही माफिया बोलून लोकांची बदनामी करत आहे. कंगनाने जर अशा लोकांची नावं समोर आणली तर मी तिला पाठिंबाच देईन. पण ती कोणाचंही नाव सांगत नाही, त्यामुळे यातून काय सिद्ध होतं?"