तनुश्रीच्या गाडीवर हल्ला करणारा 'तो' व्यक्ती सापडला
व्हिडीओमध्ये एक लांब केस असलेला व्यक्ती प्रामुख्यानं तनुश्रीच्या गाडी तोडफोड करताना दिसत आहे. या व्यक्तीच्या हातात कॅमेरा दिसत असून तो खुप रागात असल्याचं दिसून येत आहे.
मुंबई : अभिनेत्री तनुश्री दत्ता सध्या नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे चर्चेत आहेत. तनुश्री दत्ताच्या गाडीवर हल्ला झाल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक लांब केस असलेला व्यक्ती तनुश्रीच्या गाडीची तोडफोड करताना दिसत आहे. या व्यक्तीच्या हातात कॅमेरा असून तो खुप रागात असल्याचं दिसून येत आहे.
मात्र, व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल की तनुश्रीच्या गाडीची तोडफोड करणारा हा व्यक्ती नेमका कोण आहे? त्याच्या रागाचं नेमकं कारण काय आहे? तनुश्रीच्या गाडीची तोडफोड करणं आणि चाकांची हवा काढण्यामागे त्याचा नेमका हेतू काय आहे? अशी अनेक प्रश्न तुम्हाला पडली असतील.
या व्हायरल व्हिडीओमधील हा व्यक्ती पवन भारद्वाज असून तो कॅमेरामन आहे. पवन 10 वर्षापूर्वी हिंदी चित्रपट 'हॉर्न ओके प्लीज'च्या सेटवर शूटिंगदरम्यान झालेल्या वादावेळी तेथे उपस्थित होता. 'एबीपी न्यूज'नं पनव भारद्वाजला शोधून काढलं आणि त्याच्या रागाचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला.
पवन यांनी त्यादिवशी घडलेला सगळा प्रकार सांगितला. पवन भारद्वाज तनुश्रीच्या वादाची बातमी शूट करण्यासाठी रिपोर्टरसोबत गोरेगावच्या फिल्मीस्तान स्टुडिओमध्ये गेले होते. तनुश्री सेटवरून बाहेर येत वॅनिटी वॅनमध्ये जात असताना उपस्थित कॅमेरामन तिचं व्हिडीओ शुटिंग करू लागले. त्यावेळी तनुश्रीचे वडील रागात माझ्याकडे आले आणि माझ्या हातातील कॅमेरा हिसकावून घेतला आणि जमिनीवर आपटला. ज्यामध्ये माझा कॅमेरा पूर्णपणे तुटला, अशी माहिती पवन भारद्वाज यांनी दिली.
त्यानंतर तनुश्री दत्ताच्या वडिलांनी माझ्यासोबत असलेल्या रिपोर्टरशी गैरवर्तन करत मारहाण केली. माझ्यासोबतच्या रिपोर्टरच्या बचावासाठी मी गेलो असता तनुश्रीच्या वडिलांना माझे केस ओढले आणि मला ढकलून दिल्याचं पवन यांनी सांगितलं.
मी खाली पडलेलो असताना तनुश्रीची गाडी माझ्या पायावरून पुढे निघून गेली. मात्र आमच्यासोबत झालेल्या गैरवर्तनामुळे रागावलेल्या लोकांनी फिल्मीस्तान स्टुडियोच्या गेटवरच तनुश्रीची गाडी रोखली आणि गाडीला घेराव घातला.
माझा तुटलेला कॅमेरा दाखवत तनुश्री दत्ताकडे मी कॅमेऱ्याची नुकसान भरपाईची मागणी केली. मात्र गाडीत बसलेल्या तनुश्री आणि तिच्या आई-वडिलांनी माझ्याकडे दुर्लक्ष केलं. त्यावेळी रागात मी तनुश्री दत्ताच्या गाडीची तोडफोड केल्याची माहिती पवन यांनी दिली.
मनसेचा या प्रकरणआशी संबंध नाही- पवन भारद्वाज
व्हिडीओत गाडीची तोडफोड करणाऱ्या इतर लोकांबद्दल विचारणा केली असता, ते लोक कोण होते याची माहिती नसल्याचं पवन यांनी सांगितलं. काही वेळात पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि पवन भारद्वाज यांना गोरेगाव पोलीस स्टेशनला घेऊन गेले. त्यानंतर पवन यांनी तनुश्री आणि तिच्या वडिलांविरोधात गैरवर्तन करत कॅमेऱ्याची तोडफोड केल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली.
तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने माझ्यावर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांचा या हल्ल्यात सहभाग असल्याचं संशय व्यक्त केला जात आहे. मात्र तनुश्रीवर झालेल्या हल्ल्यावेळी मनसेचा एकही कार्यकर्ता तेथे उपस्थित नसल्याचं आणि मनसेशी या प्रकरणाचा काहीही संबंध नसल्याचं पवन यांनी सांगितलं.
काय आहे प्रकरण?'हॉर्न ओके..' सिनेमाच्या एका स्पेशल गाण्याचं शूटिंग सुरु होतं. त्यावेळी नाना पाटेकरांनी मला बाहुपाशात घेतलं. कोरिओग्राफर्सना दूर व्हायला सांगून डान्स कसा करावा, हे ते दाखवत होते, असं तनुश्रीने सांगितलं. 'झूम टीव्ही'ला दिलेल्या मुलाखतीत तनुश्रीने हा आरोप केला होता.
तो 'सोलो' डान्स असल्याचं काँट्रॅक्टमध्ये स्पष्ट लिहिलेलं असतानाही त्यांना माझ्यासोबत इन्टिमेट सीन करायचा होता. मी इतकी अनकम्फर्टेबल झाले, की अखेर मी ते गाणं न करण्याचा निर्णय घेतला. तो अनुभव आठवून मी आजही दचकते, असं तनुश्री सांगते.