Nimisha Sajayan : 'द ग्रेट इंडियन किचन'ची नायिका मराठीत, 'हवाहवाई' सिनेमात निमिषा सजयन मुख्य भूमिकेत
Nimisha Sajayan : 'हवाहवाई' या सिनेमात 'द ग्रेट इंडियन किचन'च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली निमिषा सजयन मुख्य भूमिकेत आहे.
Nimisha Sajayan : 'हवाहवाई' (Hawahawai) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. या सिनेमाच्या माध्यमातून 'द ग्रेट इंडियन किचन'फेम निमिषा सजयनने (Nimisha Sajayan) मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. 'हवाहवाई' सिनेमात निमिषाने ज्योती पवार हे पात्र साकारलं आहे.
निमिशाची निवड कशी झाली?
निमिशाचा 'द ग्रेट इंडियन किचन' हा गाजलेला सिनेमा 'हवाहवाई'चे दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी पाहिला होता. त्यानंतर त्यांनी निमिषाला 'हवाहवाई' सिनेमासाठी विचारणा केली. निमिशालादेखील 'हवाहवाई' सिनेमाचं कथानक आवडलं. ज्योती पवार हे जिद्दी पात्र भावलं. त्यामुळेच तिने हा सिनेमा करण्याचा निर्णय घेतला. निमिशा केरळची असली तरी तिचा जन्म मुंबईत झालेला आहे.
'हवाहवाई' सिनेमाच्या शूटिंगसंदर्भात निमिषा म्हणाली," दाक्षिणात्य सिनेसृष्टी ते मराठी सिनेमापर्यंतचा प्रवास खूप काही शिकवणारा होता. दाक्षिणात्य सिनेमांत काम करत असताना मराठी सिनेमाची ऑफर येऊ शकते असं वाटलं नव्हतं. पण आता मराठी सिनेमा केल्याचा अभिमान आहे. या सिनेमातील माझी भूमिका मला आवडल्याने मी हा सिनेमा करण्याचा निर्णय घेतला".
शूटिंगदरम्यान निमिषाने खाल्ले चोरुन मोदक
निमिषा शूटिंग दरम्यानचे किस्से शेअर करत म्हणाली,"हवाहवाई' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान पोळी, चिकन करी, तांबडा-पांढरा रस्सा अशा सर्व गोष्टींवर चांगलाच ताव मारला आहे. चोरुन मोदकदेखील खाल्ले आहेत. मराठी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीच्या संस्कृतीमध्ये थोडा फरक जाणवला. पण 'हवाहवाई'च्या शूटिंग दरम्यान मला सेटवरील सर्वांनी मदत केली".
निमिषा पुढे म्हणाली,"चांगले सिनेमे, चांगलं कथानक, दिग्दर्शक, लेखक आणि भूमिका असेल तर मला मराठीत काम करायला आवडेल. त्या सिनेमांसाठी मी खास मराठी शिकेल आणि डब करेल".
7 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'हवाहवाई'
'हवाहवाई' हा सिनेमा 7 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या लेखन, दिग्दर्शन आणि संकलनाची धुरा महेश टिळेकर यांनी सांभाळली आहे. निमिषासह वर्षा उसगावकर, सिद्धार्थ जाधव, समीर चौघुले अशा दमदार कलाकारांची फौज 'हवाहवाई' या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या सिनेमाची प्रेक्षक प्रतीक्षा करत आहेत.
संबंधित बातम्या