Sushant Singh Rajput Case: सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात आरोपी सिद्धार्थ पिठानीला लग्नासाठी अंतरिम जामीन
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणात आरोप असलेला आणि ड्रग प्रकरणात अटकेत असलेल्या सिद्धार्थ पिठानीला लग्नासाठी अंतरिम जामीन देण्यात आला आहे.
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात आरोपी सिद्धार्थ पिठानीला मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. लग्नासाठी 15 दिवसांचा तात्पुरता जामीन मिळाला आहे. 50 हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्याचे कोर्टाने निर्देश दिले आहेत. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या संशयास्पद मृत्यूच्या दिवशी त्याच्या घरात असलेल्या आणि ड्रग प्रकरणात अटकेत असलेला सिद्धार्थ पिठानीचे 26 जून 2021 रोजी लग्न आहे.
नार्कोटीक्स ब्युरो कंट्रोल अर्थात एनसीबीनं ड्रग प्रकरणात 28 मे 2021 रोजी हैदराबादमधील घरातून अटक केली आणि मुंबईला आणले होते. काही काळ नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या कोठडीत राहिल्यानंतर सिद्धार्थ पिठानीची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली होती. त्याने ठरलेल्या स्वतःच्या लग्नाचे कारण देत अंतरिम जामीन मिळवला. ड्रग केस हाताळणाऱ्या एनडीपीएस कोर्टाच्या न्यायाधीशांनी सिद्धार्थ पिठानीला लग्नासाठी 2 जुलै 2021 पर्यंत अंतरिम जामीन दिला आहे. या काळात कायद्याचे पालन करण्याचे तसेच जामिनाची मुदत संपताच हजर होण्याचे आदेश कोर्टाने सिद्धार्थ पिठानीला दिले.
सिद्धार्थ हा सुशांतचा फ्लॅटमेट, त्याचा मित्र होता, सदर प्रकरणामुळं मुंबई पोलीस, सीबीआय आणि ईडीकडूनही त्याची चौकशी करण्यात आली होती. दरम्यान, जून 8 ते जून 14, 2020 या काळात नेमकं काय घडलं होतं, याची माहिती सिद्धार्थनं पोलिसांना चौकशीदरम्यान दिली होती. दिशा सालियन हिच्या मृत्यूचा सुशांतवर काय आणि कसा परिणाम झाला हेसुद्धा त्यानं सांगितलं असल्याचं कळत आहे.
विकास सिंह या सुशांत सिंह राजपूत याच्या कुटुंबीयांच्या वतीनं हे प्रकरण हाताळणाऱ्या वकिलांनी सिद्धार्थच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला होता. तो अतिशय तरबेज गुन्हेगार आहे. त्यानं असं केलं की, एफआयआर दाखल होईपर्यंत त्यानं रियाची मदत केली. एफआयआर दाखल होताक्षणीच त्याचं रियाशी वागणं, ती दोषी असल्याच्या चर्चांनी जोर धरल्यावर ई मेल लिहिणं हे सारं संशयास्पद होतं, असं विकास सिंह यांनी म्हटलं होतं.
सिद्धार्थ पिठानीवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ड्रगची खरेदी करणे आणि ड्रग खरेदी तसेच साठवणुकीसाठी मदत करणे असे आरोप ठेवले आहेत. एनडीपीएस कलम 27 अ अंतर्गत सिद्धार्थ पिठानी विरोधात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने कारवाई सुरू केली आहे.