शाहरुखच्या 'पठाण'मध्ये सलमानची एंट्री होणार!
सलमान आणि शाहरुखमधला वाद एकेकाळी थांबायचं नाव घेत नव्हता. पण आता गोष्टी बदलल्या आहेत. आता दोघेही एकमेकांच्या सिनेमात असतात. आणखी एका नव्या सिनेमाची यात भर पडणार आहे.
मुंबई : सलमान खान आणि शाहरुख खान.. बॉलिवूडचे दोन सुपरस्टार. दोघांचे सिनेमे आले की दोन्ही सिनेमे 100 कोटींचा आकडा पार करतात. दोघांमध्ये चुरस असली तरी दोघेही एकमेकांच्या सतत संपर्कात असतात. अर्थात दोघांमध्ये जरा कुरबुरीही होत्या. दोघांमधला झगडा एकेकाळी थांबायचं नाव घेत नव्हता. पण आता गोष्टी बदलल्या आहेत. आता दोघेही एकमेकांच्या सिनेमात असतात. आणखी एका नव्या सिनेमाची यात भर पडणार आहे.
साधारण चार वर्षांपासून सलमान आणि शाहरुखमधलं वितुष्ट शमलं. म्हणून 2017 मध्ये आलेल्या 'ट्युबलाईट'मध्ये शाहरुख खानने कॅमिओ केला होता. तर शाहरुख खानच्या 'झीरो'मध्ये सलमान खान अवतरला होता. आता पुन्हा एकदा शाहरुख खानच्या 'पठाण' या सिनेमात सलमानला येण्याची विनंती करण्यात आली आहे. या सिनेमात मात्र आता सलमान 'टायगर' म्हणून अवतरणार आहे. सलमानची 'पठाण'मधली भूमिका एक महत्वाची भूमिका असल्याचं कळतं. सलमाननेही या सिनेमाला होकार दिला आहे.
वेगवेगळ्या कलाकारांना सिनेमात घेऊन सिनेमाची रिस्क कमी करण्याचा नवा पायंडा आता बॉलिवूडमध्ये पडू लागला आहे. म्हणूनच 'सिंबा'मध्ये रोहित शेट्टीने अजय देवगणची धडाकेबाज एंट्री ठेवली होती. आगामी अक्षय कुमारच्या 'सूर्यवंशी'मध्येही रणवीर सिंग, अजय देवगण असणार आहे. यापूर्वी सलमान-शाहरुख यांनी एकमेकांच्या सिनेमात काम केलं आहेच. इतर अनेक छोट्या छोट्या भूमिका वेगवेगळे कलाकार वठवत असतात. लोकांना ही सरप्राईजेस आवडतात. म्हणूनच 'पठाण' सिनेमात शाहरुखने सलमानला घेऊन तिकीट बारीवर दोघांच्या फॅन्सना आणण्याचा प्रयत्न चालवला आहे. अर्थात चित्रपट चांगला असला तरच चालतो हेही तितकंच खरं.