Salman Khan: सलमान खान पुन्हा कायद्याच्या कचाट्यात! कोर्टानं धाडलीय नोटीस, नेमकं प्रकरण काय ?
या संपूर्ण वादावर अद्याप सलमान खान किंवा त्या पान मसाला कंपनीने कोणतंही अधिकृत वक्तव्य दिलेलं नाही. सध्या सलमान ‘बॅटल ऑफ गलवान’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

Salman Khan: बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान पुन्हा एकदा कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. मात्र या वेळी कारण कोणत्याही चित्रपटाचं किंवा वादाचं नाही, तर पान मसाल्याच्या जाहिरातीचं आहे. राजस्थानच्या कोटा ग्राहक न्यायालयाने सलमान खानला नोटीस बजावली असून त्याच्यावर भ्रामक आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीचा आरोप करण्यात आला आहे.
या संपूर्ण वादावर अद्याप सलमान खान किंवा त्या पान मसाला कंपनीने कोणतंही अधिकृत वक्तव्य दिलेलं नाही. सध्या सलमान ‘बॅटल ऑफ गलवान’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अपूर्व लखिया करत आहेत. तसेच सलमान सध्या ‘बिग बॉस 19’ या रिअॅलिटी शोचं सूत्रसंचालनही करत आहे. (Bollywood News)
Salman Khan: काय आहे प्रकरण?
राजस्थान उच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील आणि राजकीय नेते इंदर मोहन सिंग हनी यांनी सलमान खानविरोधात ही तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या मते, ज्या कंपनीच्या पान मसाल्याचं सलमानने प्रमोशन केलं, त्यांनी आपल्या उत्पादनाला केशरयुक्त इलायची आणि केशर मिश्रित पान मसाला म्हणून सादर केलं. मात्र, तक्रारदाराच्या मते हा दावा पूर्णपणे खोटा आहे, कारण केशराची किंमत सुमारे चार लाख रुपये प्रति किलो आहे. त्यामुळे इतक्या महाग वस्तूचा वापर पाच रुपयांच्या पाउचमध्ये शक्यच नाही, असं त्यांनी न्यायालयात नमूद केलं आहे.
याचिकाकर्त्याचं म्हणणं काय?
हनी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, “सलमान खान हा करोडो लोकांचा आदर्श आहे. जेव्हा तो एखाद्या उत्पादनाचं प्रमोशन करतो, तेव्हा लोक त्यावर विश्वास ठेवतात. परदेशात अनेक मोठे कलाकार कोल्ड ड्रिंकसुद्धा प्रमोट करत नाहीत, पण आपल्या देशात स्टार्स पान मसाल्यासारख्या हानिकारक उत्पादनांचं प्रमोशन करतात. त्यामुळे युवकांना चुकीचा संदेश दिला जातो.” कोटा ग्राहक न्यायालयाने या प्रकरणात सलमान खान आणि संबंधित कंपनीला नोटीस पाठवली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 27 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे. तक्रारीत नमूद केलं आहे की अशा प्रकारच्या जाहिराती समाजात आणि तरुणांमध्ये गैरसमज आणि चुकीचे संदेश पसरवतात.
सेलिब्रिटी आणि वादग्रस्त जाहिराती
ही पहिलीच वेळ नाही की एखाद्या मोठ्या स्टारला जाहिरातीमुळे कोर्टाकडून नोटीस मिळाली आहे. यापूर्वी अमिताभ बच्चन, अक्षय कुमार आणि अजय देवगण यांनाही तंबाखू आणि पान मसाल्याशी संबंधित जाहिरातींमुळे टीकेचा सामना करावा लागला होता. आता सलमानचं नावही यात जोडल्याने पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे सेलिब्रिटींनी आरोग्यास हानिकारक उत्पादनांचं प्रमोशन करावं का? असा सवाल उपस्थित होऊ लागलाय.























