Prabhas: चित्रपटगृहातच फटाके फोडल्याने सीट्सला लागली आग; प्रभासच्या चित्रपटाच्या शो दरम्यान घडली घटना
प्रभासच्या वाढदिवसाला आंध्र प्रदेश येथील एका थिएटरमध्ये त्याच्या बिल्ला (Billa) या चित्रपटाच्या शोचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रभासच्या काही उत्साही चाहत्यांनी थिएटरमध्येच फटाके फोडले.
Prabhas: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता प्रभास (Prabhas) हा त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. प्रभासच्या आदिपुरुष या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. रविवारी (23 ऑक्टोबर) प्रभासचा वाढदिवस होता. चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन प्रभासला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अनेक सेलिब्रिटींनी देखील प्रभासच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट शेअर केल्या होत्या. प्रभासच्या वाढदिवसाला आंध्र प्रदेश येथील एका थिएटरमध्ये त्याच्या बिल्ला (Billa) या चित्रपटाच्या शोचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रभासच्या काही उत्साही चाहत्यांनी थिएटरमध्येच फटाके फोडले.
चाहत्यांनी थिएटरमध्येच फोडले फटाके
ताडेपल्लीगुडेम शहरातील एका थिएटमध्ये प्रभासच्या बिल्ला चित्रपटाच्या शोचे आयोजन करण्यात आले होते. या स्क्रिनिंग दरम्यान प्रभासच्या काही चाहत्यांनी थिएटमध्ये फटाके फोडले. फटाक्यांमुळे चित्रपटगृहातील काही सीट्सला आग लागली. हळू हळू आग पसरत होती. थिएटरमधील कर्मचाऱ्यांनी थिएटरमधील काही प्रेक्षकांच्या मदतीनं ही आग विजली.
प्रभास आणि त्याचे काका कृष्णम राजू यांचा बिल्ला हा चित्रपट तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये प्रभासच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा रिलीज करण्यात आला. काही दिवसांपूर्वी कृष्णम राजू यांचे निधन झाले. अभिनेत्री अनुष्का शेट्टीनं देखील बिल्ला या चित्रपटात प्रमुख भूमिका साकरली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
प्रभासचे काका आणि टॉलिवूडचे 'रिबेल स्टार' कृष्णम राजू यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांनी 180 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. राधे श्याम हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. कृष्णम राजू यांनी सामाजिक, कौटुंबिक, रोमँटिक, थ्रिलर कथानकावर आधारित असणाऱ्या चित्रपटांमध्ये काम केले.
प्रभासचे आगामी चित्रपट
प्रभासने 'ईश्वर' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर 'राघवेंद्र', 'वर्षम', 'योगी', 'एक निरंजन', 'रेबेल', 'बाहुबली : द बिगनिंग', बाहुबली : द कन्क्लूजन, राधे श्याम यांसारख्या चित्रपटात त्यानं काम केलं. आता लवकरच त्याचा आदिपुरुष हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात प्रभाससोबत अभिनेत्री क्रिती सेनन, सैफ अली खान हे देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. अदिपुरुषच्या टीझरला अनेकांची पसंती मिळाली. या चित्रपटाचं दिग्दर्शन ओम राऊत यांनी केलं आहे. चित्रपटाची वाट प्रेक्षक उत्सुकतेने बघत आहेत.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
Prabhas Birthday: 43 वर्षाचा प्रभास अजूनही अविवाहित; सहा हजारपेक्षा जास्त मुलींना केलं रिजेक्ट