(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mukesh Khanna : "लग्नाआधीच मुलगा आणि मुलगी..."; 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना स्पष्टच म्हणाले...
Mukesh Khanna on Live in Relationship : बॉलिवूड अभिनेत्री झीनत अमान (Zeenat Aman) यांनी काही दिवसांपूर्वी लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल भाष्य केलं होतं. अशातच आता 'शक्तिमान' (Shaktimaan) फेम अभिनेते मुकेश खन्ना यांनी अभिनेत्रीच्या वक्तव्यावर भाष्य केलं आहे.
Mukesh Khanna on Zeenat Aman Live in Relationship Comment : बॉलिवूड अभिनेत्री झीनत अमान (Zeenat Aman) 70 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. त्याकाळच्या बोल्ड अभिनेत्रींमध्ये झीनतचा समावेश होतो. रुपेरी पडद्यावर अभिनेत्रीची एक झलक पाहण्यासाठी चाहते वेडे होत असे. झीनत आज सिनेसृष्टीपासून दूर असली तरी सोशल मीडियावर मात्र चांगलीच सक्रीय आहे. अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टची चाहते प्रतीक्षा करत असतात. झीनत अनेकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने लिव्ह इन रिलेशनशिपबाबत (Live In Relationship) आपलं मत मांडलं असून त्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे. झीनतचं काहींनी कौतुक केलं असलं तर काही मंडळी मात्र तिला ट्रोल करताना दिसून येत आहेत. आता 'शक्तिमान' (Shaktimaan) फेम मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यांनीदेखील यावर आपलं मत मांडलं आहे.
झीनत अमान यांच्या वक्तव्यावर मुकेश खन्ना यांचा आक्षेप
'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना नेहमीच बॉलिवूडसह विविध विषयांवर आपलं मत मांडत असतात. अशातच आता दैनिक जागरणला दिलेल्या मुलाखतीत मुकेश खन्ना यांनी झीनत अमान यांनी केलेल्या लिव्ह इन रिलेशशिपबाबतच्या वक्तव्यावर आपलं मत मांडलं आहे. मुकेश खन्ना म्हणाले,"लिव्ह इन रिलेशनशिपसारख्या गोष्टीला भारतीय संस्कृतीत स्थान नाही. लिव्ह इन रिलेशनशिप ही पाश्चिमात्य संस्कृती आहे. परदेशातून हा ट्रेंड सुरू झाला आहे. झीनत अमानच्या वक्तव्यावर अभिनेते म्हणाले,"झीनत अमानच्या वक्तव्यावरुन हे स्पष्ट होते की ती पाश्चात्य संस्कृतीचा अवलंब करते. लिव्ह इन रिलेशनशिपमुळे मुलगा आणि मुलगी एकमेकांना ओळखतील, असं झीनत यांचं मत आहे. पण या पद्धतीच्या ओळखीची गरज नाही, असं मला वाटतं. भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने ही गोष्ट चुकीची आहे".
मुकेश खन्ना पुढे म्हणाले,"लग्नाआधीच मुलगा आणि मुलगी पती-पत्नीप्रमाणे एकत्र राहत असतील तर ही अत्यंत चुकीची बाब आहे. लग्नाआधी मुलगा आणि मुलीने फक्त संवाद साधण्याची गरज आहे. मुकेश खन्ना यांच्याआधी मुमताज आणि सायरा बानो या दोन्ही अभिनेत्रींनी झीनत अमानच्या वक्तव्यावर कडाडून विरोध केला होता. अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्यावरदेखील त्यांनी भाष्य केलं होतं. दोन्ही अभिनेत्री लिव्ह-इन रिलेशनशिपच्या समर्थनात नव्हत्या.
मुकेश खन्ना यांनी 'या' कारणाने लग्न केलं नाही
मुकेश खन्ना म्हणाले होते,"मी लग्नसंस्थेविरोधात आहे. लग्न करण्यासाठी योग्य जोडीदाराची गरज असते. लग्नामुळे दोन व्यक्ती नव्हे तर दोन कुटुंब जोडली जात असतात. लग्नानंतर पती-पत्नीला 24 तास एकमेकांसोबत राहावं लागतं. लग्न हे नशिबात असावं लागतं. माझ्या नशिबात लग्न हे लिहिलेलं नाही. मला लग्नासाठी योग्य जोडीदार मिळालेली नाही". 'शक्तिमान' या मालिकेमुळे मुकेश खन्ना घराघरांत पोहोचले. बीआर चोप्रा यांच्या 'महाभारत'मध्ये त्यांनी साकारलेली भीष्म पीतामहची भूमिका चांगलीच गाजली.
संबंधित बातम्या