'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' ठरणार जगातील पहिला मराठी हॉलिवूड सिनेमा, मराठीसह इंग्रजी भाषेत चित्रित होणार
First Marathi Hollywood Cinema: 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' सिनेमा 2022 च्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा जगातील पहिला मराठी हॉलिवूड सिनेमा असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
First Marathi Hollywood Cinema: छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याला अबाधित राखण्याचे काम त्यांच्या निधनानंतर अनेक छत्रपतींनी केले. पण या स्वराज्य रक्षणाच्या कार्यात महत्त्वाच्या ठरतात त्या छत्रपती ताराराणी. लवकरच सोनाली कुलकर्णी 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' या सिनेमातून छत्रपती ताराराणींच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भाऊबीजेच्या दिवशी सोनालीने या सिनेमाचं पहिलं मोशन पोस्टर तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत मराठी प्रेक्षकांना आनंदाची बातमी दिली आहे.
'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' हा जगातील पहिला मराठी हॉलिवूड सिनेमा असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. ताराराणीने त्या वेळेच्या जाचक पुरुषप्रधान संस्कृतीला छेद देत मुघल, निजामशाही, कुतुबशाही, आदिलशाही, डच, इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी या सत्तांविरुद्ध निकराचा लढा दिला होता. अशा या महाराष्ट्राच्या देदीप्यमान इतिहासात कर्तृत्व गाजवणाऱ्या छत्रपती ताराराणींवर आधारित 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' हा सिनेमा आहे. हा सिनेमा 2022 च्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद डॉ. सुधीर कदम यांचे असून राहुल जनार्दन जाधव यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. औरंगजेबसारख्या क्रूर आणि निष्ठूर राज्यकर्त्याला यमसदनी पाठवणाऱ्या छत्रपती ताराराणींची व्यक्तिरेखा मराठीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी साकारत आहे. या चित्रपटाला अवधूत गुप्ते यांनी संगीत दिले आहे.
'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' या चित्रपटाबद्दल 'प्लॅनेट मराठी'चे अक्षय बर्दापूरकर म्हणतात, "मराठी चित्रपटांना अधिक दर्जेदार बनवण्याचा प्लॅनेट मराठीचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. मराठी चित्रपटांची आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंद घेतली जावी, या दृष्टीने आमचा कायम प्रयत्न असतो. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्य अबाधित राखण्यात सिंहाचा वाटा असूनही छत्रपती ताराराणींबद्दल लोकांना इतकी माहिती नाही. त्यांचे धाडस आणि शौर्य असामान्य आहे. त्यांची ही वीरगाथा लोकांसमोर आणण्याचा 'प्लॅनेट मराठी'चा हा प्रयत्न आहे. महाराष्ट्राचा इतिहास सातासमुद्रापार संपूर्ण जगाला कळावा, यासाठी या चित्रपटाची संपूर्ण टीम खूप मेहनत घेत आहे".
Annaatth Movie Box Office: रजनीकांतच्या 'अन्नात्थे' चा विक्रम, अवघ्या दोन दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार
प्लॅनेट मराठीचे संस्थापक अक्षय बर्दापूरकर आणि 'गोल्डन रेशियो फिल्म्स' यांच्या प्रयत्नातून युनायटेडकिंगडम मधील नावाजलेली 'ब्लॅक हँगर स्टुडिओ' आणि 'ओरवो स्टुडिओ' हे 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' या चित्रपटाच्या माध्यमातून मराठीमध्ये पदार्पण करत आहेत. चित्रीकरण आणि तांत्रिक बाबीदेखील लंडनमध्येच होणारा 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' हा पहिला मराठी चित्रपट ठरणार आहे. हा चित्रपट मराठी तसेच इंग्रजी भाषेत चित्रित होणार असल्याने आता छत्रपती ताराराणींची शौर्यगाथा सातासमुद्रापार पोहोचणार आहे. उत्तम दर्जाचे व्हीएफएक्स आणि ग्राफिक्स असणाऱ्या या चित्रपटातून मराठी प्रेक्षकांना महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे.