Madhuri Dixit : 'धक धक गर्ल'ने राजकारणात येण्याच्या चर्चा फेटाळल्या; पण डॉ. नेने म्हणतात
Madhuri Dixit : माधुरी दीक्षित निवडणूक लढवणार का? याबद्दल अभिनेत्रीचे पती डॉ. श्रीराम नेने (Dr. Shriram Nene) यांनी 'माझा कट्ट्या'वर खुलासा केला आहे.
Madhuri Dixit Shriram Nene Majha Katta : 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षितने (Madhuri Dixit) एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' (Majha Katta) या विशेष कार्यक्रमात आपण कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच अभिनेत्रीचे पती डॉ. श्रीराम नेने (Dr. Shriram Nene) यांनीदेखील अभिनेत्रीच्या निवडणूक लढवण्याच्या चर्चांवर भाष्य केलं आहे.
राजकारण हा आमचा पिंड नाही : डॉ. श्रीराम नेने
माधुरी दीक्षित निवडणूक लढवणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. दरम्यान अभिनेत्रीने आता आपण निवडणूक लढवणार नसल्याची माहिती चाहत्यांना देत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. याबद्दल एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमात श्रीराम नेने म्हणाले,"राजकारण हा आमचा पिंड नाही".
डॉ. श्रीराम नेने पुढे म्हणाले,"माधुरी दीक्षित रोल मॉडेल आहे. रोल मॉडेलचं काम समाजाला दिशा दाखवण्याचं असतं. समाजात चांगल्या सुधारणा होण्याची सध्या गरज आहे. या सुधारणा झाल्या तर जगात भारत पहिल्या क्रमांकावर येईल. आपल्या देशातील मंडळी खूप हुशार आहेत. राजकारण सोडून प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होता येतं, हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. राजकारण हा आमचा पिंड नाही. दररोज वेगवेगळ्या नवीन गोष्टी शिकण्याचा आम्ही प्रयत्न करतो. लोकांना मदत करायला आम्हाला आवडतं".
View this post on Instagram
माधुरी दीक्षित निवडणूक लढवणार? (Madhuri Dixit On Lok Sabha Election 2024)
'माझा कट्ट्या'वर निवडणूक लढवण्याबद्दल माधुरी दीक्षित म्हणाली,"मी निवडणूक लढवावी ही इतरांची बकेटलिस्ट आहे. प्रत्येक निवडणुकीला मला कुठूनतरी उभं केलं जातं. पण राजकारण माझी आवड नाही. हेल्थकेअर संबंधित काम करायला मला आवडेल".
नजिकच्या काळात आपण कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचं सांगून 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितनं राजकारणातल्या पदार्पणाची बातमी चुकीची असल्याचं एबीपी माझाशी बोलताना स्पष्ट केलं. माधुरी दीक्षित आणि तिचे पती श्रीराम नेने हे निर्माते असलेला 'पंचक' हा मराठी सिनेमा 5 जानेवारी 2023 रोजी रिलीज होत आहे. त्यानिमित्त एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या लोकप्रिय कार्यक्रमात बोलताना माधुरीनं राजकारणातल्या प्रवेशाची बातमी फेटाळली. राजकारण ही माझी आवड नाही असं माधुरीनं म्हटलं आहे.
संंबंधित बातम्या