Kiran Rao Aamir Khan : आमिरसोबतच्या घटस्फोटानंतर किरण राव आहे आनंदी; मी त्याला गमावू इच्छित नव्हती, पण...
Kiran Rao Aamir Khan : किरण रावने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या घटस्फोटाबाबत पुन्हा एकदा भाष्य केले आहे.
Kiran Rao Aamir Khan : निर्माती-दिग्दर्शिका किरण रावने (Kiran Rao) आपला पूर्वाश्रमीचा पती आणि बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानसोबतच्या (Aamir Khan) नात्यावर आधी अनेकदा उघडपणे भाष्य केले आहे. तीन वर्षांपूर्वी या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेत सगळ्यांना धक्का दिला होता. मात्र, घटस्फोटानंतर दोघेही चांगले मित्र आहेत. आपल्या मुलाचे संगोपन दोघेही एकत्रितपणे करत आहेत. किरण रावने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या घटस्फोटाबाबत भाष्य केले आहे.
किरण रावने 'फेय डिसूझा'च्या शोवर बोलताना उघडपणे आपल्या आमिरसोबतच्या घटस्फोटावर भाष्य केले. किरण रावने म्हटले की, 'मला वाटतं नात्याची वेळोवेळी नव्याने व्याख्या करणे आवश्यक आहे. जसजसे आपण माणूस म्हणून मोठे होतो तसतसे आपण बदलतो. आम्हाला वेगवेगळ्या गोष्टींची गरज आहे आणि मला वाटले की हे (घटस्फोट) मला आनंद वाटेल आणि प्रामाणिकपणे सांगायचे तर या निर्णयामुळे मला खूप आनंद झाला असल्याचे किरण रावने म्हटले.
घटस्फोटाच्या निर्णयानंतर खूश आहे किरण राव
किरणने सांगितले की, आमिर आयुष्यात येण्याआधी मी बराच काळ सिंगल होती आणि आयुष्याचा आनंद घेत होती. यापूर्वी आपल्याला एकटेपणा जाणवत होता, असेही किरणने म्हटले. पण, आता आपला मुलगा आझादमुळे हा एकटेपणा वाटत नसल्याचे किरण रावने सांगितले.
किरणने पुढे म्हटले की, 'मला वाटते की एकटेपणा ही एकमेव गोष्ट आहे जेव्हा बहुतेक लोक घटस्फोट घेतात किंवा जोडीदार गमावतात तेव्हा त्यांना थोडी काळजी असते. मला अजिबात एकटेपणा वाटत नव्हता. किंबहुना मला त्याच्या कुटुंबाचा आणि माझ्या कुटुंबाचा असे दोन्हींकडून पाठिंबा मिळतो. तर, यानंतर फक्त चांगल्या गोष्टी झाल्या आहेत. हा अत्यंत चांगला घटस्फोट असल्याचे किरण रावने सांगितले.
घटस्फोटानंतर आहेत एकत्र...
किरण रावने सांगितले की, तिच्यात आणि आमिरमध्ये प्रेमाची कमतरता नाही. आमच्यात खूप प्रेम आहे, एकमेकांबद्दल आदर आहे, एक विचार आहे, थट्टा-मस्करी आहे आणि अशा काही गोष्टी आहेत, ज्या आम्ही एकमेकांमध्ये शोधत असतो. त्यामुळे मला त्याला गमवायचे नव्हते. आम्ही विवाहित आहोत हे सांगण्यासाठी आम्हाला कागदपत्रांची गरज नाही, परंतु आम्हाला माहित आहे की आम्ही एकमेकांसाठी काय आहोत? घटस्फोटानंतरही काळाच्या कसोटीवर टिकणारे हे नातं असल्याचे किरणने सांगितले.