Kiran Mane: "कुणी कितीही भडकवायचा प्रयत्न करू दे, आपण तोल जाऊ द्यायचा नाही"; किरण मानेंच्या पोस्टनं वेधलं लक्ष
Kiran Mane: "एकीचे बळ ओळखा" असं किरण माने यांनी त्यांच्या फेसबुकवरील पोस्टच्या माध्यमातून नेटकऱ्यांना सांगितलं आहे.
Kiran Mane: अभिनेते किरण माने (Kiran Mane) हे काही दिवसांपासून किरण माने हे त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आहेत. किरण माने हे विविध विषयांवर आधारित असणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करतात. नुकतीच किरण माने यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. "एकीचे बळ ओळखा" असं किरण माने यांनी त्यांच्या फेसबुकवरील पोस्टच्या माध्यमातून नेटकऱ्यांना सांगितलं आहे.
"एकीचे बळ ओळखा. कोणताही समाज जेव्हा काही महत्त्वाच्या धाग्यांनी एकत्र घट्टपणे गुंफलेला असतो, तेव्हा बाहेरच्या विघातक शक्तींना त्यांच्यावर विजय मिळवणे अशक्य असते. सध्याच्या बिहारमध्ये असलेल्या, त्या काळातल्या वैशाली नगरीतील महापराक्रमी लढवय्ये 'लिच्छवी' जमातीचे लोक तथागत बुद्धांना अभिवादन करायला आले होते, तेव्हा त्यांना उपदेश करताना बुद्धांनी वरील विचार सांगीतले होते. हे लिच्छवी,ज्यांना वज्जी असंही म्हणत, ते अतिशय शूर आणि धैर्यवान होते. छत्रपती शिवरायांची गनिमी काव्याची जी पद्धती होती - डोळ्याची पापणी लवायच्या आत झटकन हल्ला करून वार्याच्या वेगानं परत फिरणे - ही पद्धती खूप आधीच्या काळात लिच्छवींमध्ये आढळते. जोवर हे लिच्छवी लोक बुद्धांचा संदेश मानून एकजुटीने रहात होते, तोवर अजातशत्रू नांवाचा बलाढ्य राजा त्यांच्यावर विजय मिळवू शकला नव्हता. अजातशत्रूचा वस्सकार नांवाचा उच्चवर्णीय धूर्त मित्र होता. शातिर दिमाग ! त्यानं प्लॅनिंग करून कटकारस्थानानं त्या लिच्छवींमध्ये अंतर्गत फूट पाडली. मग अजातशत्रूनं अतिशय सहजपणे त्यांची धूळधाण उडवत त्यांचे राज्य जिंकले. असो."
"म्हणून माझ्या भावांनो आणि बहिणींनो... कुणी कितीही भडकवायचा प्रयत्न करूदे, आपण तोल जाऊ द्यायचा नाही. द्वेषाला प्रेमानं उत्तर द्यायचं. शांततेत! तुम्ही अस्वस्थ होऊन एकमेकांच्या जीवावर उठावं म्हणून कुणी मुद्दाम एखाद्या महामानवावर चिखलफेक करेल. कुणी पुतळ्यावर किंवा देवदेवतेच्या मूर्तीवर घसरेल. आपण शिव-शाहू-फुले-आंबेडकर या चार महापुरूषांचे हात एकामेकांत घट्ट धरून ठेवायचे. काहीही झालं, कुणी कितीही भरकटवलं तरी विचारांची विटंबना नाही होऊ द्यायची. छितपुट गोष्टीवरून आपण माथी भडकवून घेतली,तर आपला 'लिच्छवी' होईल. कुणी एखाद्या जातीवर किंवा धर्मावर टीका टिप्पणी, टोमणेबाजी केली तर ओळखायचं की कारस्थान शिजलंय. आपण सावध व्हायचं. माणसामाणसात फूट पडू द्यायची नाही. आम्ही सगळे जातीधर्मातले लोक 'माणूस' म्हणून एक आहोत. आमची माती एक आहे. आमचा देव आणि आमचा धर्म आमच्या काळजात सुरक्षित आहे. हा संदेश 'दूर तलक' गेला पायजे भावांनो!"
इतर महत्वाच्या बातम्या:
Kiran Mane: "अस्पृश्यतेचे चटके सोसलेला तो पोरगा..."; किरण मानेंच्या पोस्टनं वेधलं लक्ष