(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kiran Mane: "अस्पृश्यतेचे चटके सोसलेला तो पोरगा..."; किरण मानेंच्या पोस्टनं वेधलं लक्ष
Kiran Mane: नुकतीच किरण माने यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल लिहिलं आहे.
Kiran Mane: अभिनेते किरण माने (Kiran Mane) हे नाटक, मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. काही दिवसांपासून किरण माने हे त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आहेत. किरण माने हे विविध विषयांवर आधारित असणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करतात. नुकतीच किरण माने यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल लिहिलं आहे.
किरण माने यांनी पोस्टमध्ये लिहिलं, 'पहिलाच सिन होता. स्क्रीप्ट हातात आलं. दहा-बारा वर्षांचा एक छोटा पोरगा रोज चर्नी रोड उद्यानात येऊन मनापासून अभ्यास करतो हे मी पहात असतो. त्याच्या वयाची इतर मुलं खेळण्यात गुंग असताना पुस्तकांत रमलेल्या या पोराविषयी माझ्या मनात कुतूहल चाळवतं. मी त्याच्याशी ओळख करून घेतो. बालपणीपासून अस्पृश्यतेचे चटके सोसलेला तो पोरगा सुरूवातीला थोडा बुजतो. मी मराठा आहे हे त्याच्या लक्षात येतं. तरीही खांद्यावर हात ठेवून आपुलकीने बोलणार्या माझ्याशी तो हळूहळू खुलून बोलू लागतो. मी त्याला महात्मा फुलेंचं 'गुलामगिरी' हे पुस्तक वाचायला देतो. त्या पोराचं नांव असतं 'भिवा'. भिमराव रामजी आंबेडकर! मी ज्यांची भुमिका करत होतो, ते होते गुरुवर्य केळुस्कर गुरूजी. हो, तेच केळुस्कर गुरूजी ज्यांनी छ. शिवाजी महाराजांचं पहिलं 'ऑथेंटिक' चरीत्र लिहीलं होतं.हा सिन करताना माझा मी राहीलो नव्हतो. पुर्वी कधीतरी बाबासाहेबांची पुस्तकं वाचताना ज्या माणसाचा उल्लेख बाबासाहेबांनी अत्यंत प्रेमानं, जिव्हाळ्यानं केलेला मी वाचला होता.छोट्या भिवाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर बनवण्यात ज्या माणसाचा मोलाचा वोटा होता.ती भुमिका साकारायला मिळणं हे माझ्या दृष्टीनं अतिशय आनंद देणारं ठरलं!'
"केळुस्कर गुरूजींनी नंतर भिवाच्या शिक्षणासाठी जीवाचं रान केलं. परदेशी जायला शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याकडे भिमरावाची शिफारस केली.सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, बाबासाहेब पहिल्यांदा बुद्धाकडे वळले ते केळुस्कर गुरूजींमुळे ! तो सिन करताना मी भारावून गेलो होतो, ज्यावेळी मॅट्रिक पास झालेल्या भिवाचा सत्कार आयोजित करून केळुस्कर गुरूजींनी आशिर्वाद म्हणून त्याला स्वलिखित 'गौतम बुद्ध यांचे चरित्र' हे पुस्तक भेट दिले.बाबासाहेबांनी लिहून ठेवलं आहे की, "दादा केळूस्करांनी दिलेल्या पुस्तकामुळे मी बुद्धाकडे वळलो. त्या लहान वयात बुद्ध आणि त्यांचा धम्म यात रस घेण्याची ही माझी सुरुवात होती." गुरूजींनी पुस्तक दिले तेव्हा भिवा सोळासतरा वर्षांचा होता. पुढे पन्नास वर्षे बाबासाहेबांनी सवड मिळेल तेव्हा गौतम बुद्धांचे चरित्र आणि तत्वज्ञान याचा अभ्यास केला आणि अखेर या अभ्यासाचं फलित म्हणजे त्यांनी बुद्ध धम्माचा स्वीकार केला !आज 'धम्मचक्र प्रवर्तन दिन' ! आजच्या दिवशी दीक्षाभूमी, नागपूर इथं बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांसोबत बौद्ध धर्मात प्रवेश केला. या घटनेला जो महान माणूस कारणीभूत होता, ती भुमिका साकारायला मिळणं हे माझ्यासाठी अभिनयप्रवासाचं सार्थक करणार्या अनेक गोष्टींपैकी एक, खूप काळजाजवळची गोष्ट आहे.
धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या मंगलमय शुभेच्छा." असंही किरण माने यांनी पोस्टमध्ये लिहिलं.
इतर महत्वाच्या बातम्या: