Ideas Of India 2024: चित्रपट चालला नाही याचं दु:ख आहेच पण..., लाल सिंह चड्ढाच्या अपयशानंतर काय होती आमिर खानची प्रतिक्रिया?
Ideas Of India 2024: एबीपी नेटवर्कच्या Ideas Of India 2024 या कार्यक्रमामध्ये बॉलीवूड अभिनेता आमिर खान याने हजेरी लावली होती.
Ideas Of India 2024: काही वर्षांपूर्वी आमिर खानचा (Amir Khan) लाल सिंग चड्ढा (Lal Singh Chaddha) हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात आमिरसह अभिनेत्री करिना कपूर खान ही त्याच्यासोबत मुख भूमिकेत होती. या चित्रपटाची कथा थोडी वेगळी होती, पण या चित्रपटला प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडता आली नाही. आमिर खानला बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हटले जाते. त्याला त्याच्या सिनेमाची गोष्ट आणि त्याचा अभिनय हा परिपूर्ण ठेवायचा असतो. पण आमिरचा हा चित्रपट मात्र काही अंशी नापास झाला.
खरंतर आमिर खानच्या नावावर फार कमी फ्लॉप चित्रपट आहेत. त्यामुळे लाल सिंग चड्ढा फ्लॉप झाल्यानंतर आमिरची नेमकी भूमिका काय होती, त्याला काय वाटलं होतं, याबाबत त्याने एबीपी नेटवर्कच्या Ideas Of India 2024 या कार्यक्रमामध्ये खुलासा केला आहे. त्याच्या या चित्रपटाची बरीच चर्चा होती. पण प्रेक्षकांच्या पसंतीस या चित्रपटाला उतरता आले नाही. आमिरने नेमकं काय म्हटलं याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
लाल सिंग चड्ढाच्या अपयशाबाबत आमिर खानने काय म्हटलं?
लाल सिंग चड्ढा या चित्रपटाविषयी बोलताना आमिर खान म्हणाला की, अद्वैत, मी, करीना या तिघांनी चित्रपटावर खूप मेहनत घेतली पण ती सार्थकी ठरली नाही. जेव्हा मी अपयशांकडे पाहतो तेव्हा मला वाटते की माझ्यासाठी काहीतरी शिकण्याची सर्वात मोठी संधी आहे. या चित्रपटामुळे दोन गोष्टी घडल्या. एक तर माझा चित्रपट बराच काळ चालला नाही. त्यामुळे मी तेव्हा घरी होतो. माझ्या घरी कुटुंबातील लोक आणि मित्र येत होते. माझी चौकशी करत होते. दोन-तीन आठवड्यांनंतर मला या गोष्टींची जाणीव झाली. तेव्ही मी कुटुंबासोबत बसल्यावर म्हणालो होतो की, यार, फ्लॉप झाल्यावर इतकं प्रेम मिळालं असतं तर अजून 2 -4 सिनेमे दिले असते.
चित्रपटाच्या अपयशानंतर आमिरची प्रतिक्रिया काय होती?
या चित्रपटाच्या अपयशानंतर आमिरने म्हटलं की, अपयशामुळे तुम्हाला शिकण्याची, तुमच्या संवादात काय कमतरता आहे हे समजून घेण्याची संधी मिळते. मी याबद्दल खूप विचार केला आणि मी किरणला सांगत होतो की ही माझ्यासाठी खूप मोठी शिकवण आहे. या चित्रपटात आणि अनेक पातळ्यांवर माझ्याकडून खूप चुका झाल्या आहेत. सर्व चुका एकाच चित्रपटात झाल्या.हे वेगळ्या चित्रपटात घडले असते तर गडबड झाली असती. चित्रपट चालला नाही याचे मला भावनिक दु:ख आहे.