Harishchandrachi Factory: भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळकेंची कामगिरी दाखवणारा 'हरिश्चंद्राची फॅक्टरी'; लक्ष वेधून घेणारी सिनेमातील प्रत्येक फ्रेम
दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke) यांचा चित्रपट निर्मितीचा प्रवास 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' (Harishchandrachi Factory) या चित्रपटामध्ये दाखवण्यात आला आहे.
Harishchandrachi Factory: भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke) यांची 30 एप्रिलला जयंती आहे. ज्या काळात केवळ नाटक आणि लोककलेमधून भारतातील लोकांचे मनोरंजन केले जात होते, त्याच काळात दादासाहेब फाळके यांनी चित्रपट निर्मितीचे तंत्र भारतात आणून भारतीयांना चित्रपटाची ओळख करुन दिली. धुंडिराज गोविंद फाळके म्हणजेच दादासाहेब फाळके यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. चित्रपट निर्मिती करण्यासाठी त्यांनी स्वत:च्या घरातील वस्तू, तसेच स्वत:च्या पत्नीचे दागिने देखील विकले. दादासाहेब फाळके यांचा चित्रपट निर्मितीचा प्रवास 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' (Harishchandrachi Factory) या चित्रपटामध्ये दाखवण्यात आला आहे.
"लाईफ ऑफ ख्रिस्त" हा मुकपट पाहिल्यानंतर दादासाहेब यांच्यामध्ये चित्रपट निर्मितीची आवड निर्माण झाली. त्यानंतर त्यांनी राजा हरिश्चंद्र या मराठी आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या चित्रपटाची निर्मिती केली. 3 मे 1913 या दिवशी मुंबईच्या कॉरोनेशन चित्रपटगृहात प्रेक्षकांना हा चित्रपट पहिल्यांदा दाखवण्यात आला. दादासाहेब फाळके यांची पत्नी सरस्वतीबाई यांनी देखील त्यांना चित्रपट निर्मिती करण्यासाठी साथ दिली. हे सर्व 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. 29 जानेवारी 2010 रोजी हा चित्रपट भारतात रिलीज झाला. त्याआधी 2009 मध्ये हा चित्रपट ओशियन्स सिनेफॅन या फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाचं स्क्रिनिंग करण्यात आलं.
'हरिश्चंद्राची फॅक्टरी' चित्रपटामधील कलाकार
'हरिश्चंद्राची फॅक्टरी' या चित्रपटात दादासाहेब फाळके यांची भूमिका अभिनेते नंदू माधव यांनी साकारली आहे. तर दादासाहेब फाळके यांची पत्नी सरस्वतीबाई यांची भूमिका विभावरी देशपांडेनं साकारली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन परेश मोकाशी यांनी केलं आहे. चित्रपटातील प्रत्येक फ्रेम ही लक्ष वेधून घेणारी आहे. या चित्रपटात प्रवीण तरडे, संदीप पाठक यांसारख्या कलाकारांनी देखील महत्वाची भूमिका साकारली. रॉनी स्क्रूवाला आणि परेश मोकाशी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.