Happy Birthday Sulakshana Pandit: ... म्हणून आजन्म अविवाहित राहिल्या सुलक्षणा पंडित! वाचा अभिनेत्रीची ‘अधुरी प्रेमकहाणी’
Sulakshana Pandit Birthday : चित्रपट आणि अभिनयामुळे चर्चेत असणाऱ्या सुलक्षणा पंडित त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत राहिल्या.
Sulakshana Pandit Birthday : बॉलिवूड अभिनेत्री सुलक्षणा पंडित (Sulakshana Pandit) या 70-80च्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्री होत्या. त्यांनी आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांना घायाळ केले होते. चित्रपट आणि अभिनयामुळे चर्चेत असणाऱ्या सुलक्षणा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत राहिल्या. आज (12 जुलै) सुलक्षणा पंडित यांचा वाढदिवस आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणाऱ्या सुलक्षणा पंडित स्वतः मात्र आयुष्यभर दुःखी राहिल्या. जाणून घेऊया त्यांच्या याच जीवनकथेबद्दल...
अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचा जन्म 12 जुलै 1954 रोजी छत्तीसगडमधील रायगड येथे झाला. त्यांनी वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी गायला सुरुवात केली. सुलक्षणा यांनी 1967मध्ये एका चित्रपटासाठी पहिले गाणे गायले आणि मनोरंजन विश्वात पदार्पण केले. मधुर आवाजासोबत त्या दिसायलाही खूप सुंदर असल्याने यादरम्यान त्यांना चित्रपटांमध्ये अभिनय करण्याच्या ऑफर्सही येऊ लागल्या. अखेर 1975 मध्ये 'उलझन' या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटात त्यांच्यासोबत अभिनेते संजीव कुमार मुख्य भूमिकेत झळकले होते.
अभिनेत्याला पाहताच क्षणी प्रेमात पडल्या!
यानंतर सुलक्षणा यांनी आपला मनोरंजन विश्वातील प्रवास यशस्वीरित्या पुढे सुरु ठेवला होता. त्यांनी, अभिनेतेराजेश खन्ना (Rajesh Khanna), जितेंद्र (Jeetendra), विनोद खन्ना (Vinod Khanna), शशि कपूर (Shashi Kapoor), शत्रुघन सिन्हा (Shatrughan Sinha) आणि संजीव कुमार (Sanjeev Kumar) अशा नावाजलेल्या अभिनेत्यांसोबत स्क्रीन शेअर केली होती. मात्र, पहिल्या चित्रपटातील अभिनेत्याला अर्थात अभिनेते संजीव कुमार यांना पाहताच क्षणी त्या त्यांच्या प्रेमात पडल्या होत्या. या प्रेमामुळे पुढे त्यांचे संपूर्ण आयुष्यचं पालटले.
संजीव कुमार यांनी धुडकावला प्रस्ताव
संजीव कुमार यांच्या स्वभावाला स्वीकारून त्या त्यांच्यावर प्रेम करू लागल्या होत्या. त्यांनी आपल्या प्रेमाची कबुलीही अभिनेत्याकडे दिली होती. मात्र, संजीव कुमार यांनी त्यांचा प्रस्ताव धुडकावला. त्यावेळी संजीव कुमार अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या प्रेमात होते. याच दरम्यान हेमा मालिनी यांच्या आईने दोघांच्या नात्याला नकार दिला आणि हेमा मालिनी-संजीव कपूर यांचे नाते तुटले. याच रागातून संजीव कुमार यांनी कधीच लग्न करणार नाही, असा निर्णय घेतला.
... म्हणून राहिल्या आजन्म अविवाहित!
संजीव आणि सुलक्षणा यांच्यात छान मैत्री होती. त्यांनी याबद्दल सुलक्षणा यांना देखील सांगितले होते. यानंतर सुलक्षणा यांनी पुन्हा एकदा त्यांच्या प्रेमाचा प्रस्ताव मांडला. मात्र, दुसरी वेळही त्यांचा प्रस्ताव नाकारला गेला. या धक्क्यामुळे त्यांनी देखील आजन्म अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला. संजीव कुमार यांच्या निधनानंतर सुलक्षणा पूर्णपणे कोलमडून गेल्या. त्यांनी मनोरंजन विश्वातूनही काढता पाय घेतला आणि या जगापासून अलिप्त राहू लागल्या.
हेही वाचा :
TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या