(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बायोपिकचा फर्स्ट लूक रिलीज
'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाचं 23 भाषेत पोस्टर लॉन्च करण्यात आलं आहे. अभिनेता विवेक ओबेरॉय चित्रपटात नरेंद्र मोदींची भूमिका साकारत आहे, तर ओमंग कुमार चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट "पीएम नरेंद्र मोदी" लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचं आज मुंबईच्या गरवारे क्लबमध्ये पोस्टर लॉन्च करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे पोस्टर लाँच करण्यात आलं.
'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाचं 23 भाषेत पोस्टर लॉन्च करण्यात आलं आहे. अभिनेता विवेक ओबेरॉय चित्रपटात नरेंद्र मोदींची भूमिका साकारत आहे, तर ओमंग कुमार चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. चित्रपटातून मोदी यांचा एक भाऊ, पुत्र, सेवक अशा अनेक पैलूंवर प्रकाश टाकला जाणार आहे.
हा एक ऐतिहासिक चित्रपट असणार आहे. कारण नरेंद्र मोदी हे केवळ देशाचेच नाही तर जगाचं नेतृत्व करु शकतील असे नेते आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदींची स्तुती केली. ज्यांच्या नेतृत्वात भारतात अनेक विकासकामं होत आहेत. अशा नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर चित्रपट बनणं हे प्रेरणादायी असून मोदींचा प्रवासही खरंच प्रेरणादायी आहे, मुख्यमंत्री म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारण माझ्यासाठी सर्वात कठीण काम आहे. तसेच मी चित्रटपटाबद्दल उत्सुक असल्याचं विवेक ओबेरॉय म्हणाला. तर विवेकचं भाग्य आहे की तो नरेंद्र मोदींची भूमिका साकारतोय अशी भावना सुरेश ओबेरॉय यांनी व्यक्त केली.