एक्स्प्लोर
...तेव्हा आमीर खानविरोधात भाजपच्या आयटी सेलची मोहीम!
मुंबई : अभिनेता आमीर खानला स्नॅपडील या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटच्या ब्रॅण्ड अॅम्बेसेडरपदावरुन हटवण्यासाठी भाजपच्या आयटी सेलनेच पुढाकार घेतल्याचं उघड झालं आहे. भाजपच्या आयटी सेल प्रमुखानेच आमीर खानला स्नॅपडीलच्या जाहिरातीतून हटवण्यासाठी मोहीम सुरु केली होती. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात आमीर खानने सरकारविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे भाजपच्या आयटी सेलने त्याच्याविरोधात वातावरण तापवलं होतं. भाजपच्या सोशल मीडिया टीममधून बाहेर पडलेल्या एका कार्यकर्तीने हा आरोप केला आहे.
पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांच्या आगामी 'आय एम ए ट्रोल' या पुस्तकात ही माहिती देण्यात आली आहे. या पुस्तकात साध्वी खोसला या एकेकाळी भाजपच्या मीडिया सेलमध्ये काम करणाऱ्या माजी कार्यकर्तीने स्वाती चतुर्वेदी यांना भाजपच्या आमीर खान विरोधी मोहीमेची माहिती दिली.
राजधानी नवी दिल्लीत 23 नोव्हेंबर 2015 रोजी झालेल्या रामनाथ गोयंका पत्रकारिता पुरस्कारांच्या वितरण कार्यक्रमात आमीर खानने सरकारविरोधी वक्तव्य केलं होतं. त्यावेळी सुरु असलेल्या असहिष्णुतेच्या मुद्द्यावर व्यक्त केलेलं मत हा चर्चेचा मोठा विषय ठरला होता. त्यानंतर भाजपच्या आयटी सेलने आमीर खानविरोधात मोठी मोहीम सुरु केली होती. त्याचाच परिणाम पुढे आमीर खान जाहिराती करत असलेल्या स्नॅपडीलवर आमीर खानबरोबरचा करार संपुष्टात आणण्यात झाला. त्यासाठीच सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात कॅम्पेन सुरु करून स्नॅपडीलवर दबाब आणण्यात आला होता.
रामनाथ गोयंका पत्रकारिता पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलताना आमीर खान म्हणाला होता, मी आणि माझी पत्नी आमीर खान भारतात जन्मलो, वाढलो. मात्र सध्याच्या असहिष्णुतेच्या वातावरणात तिला पहिल्यांदाच असं वाटायला लागलंय की आपण हा देश सोडून जायला हवं. आमीर खानच्या या वक्तव्याची राजकारणात तसंच सोशल मीडियावरही मोठी चर्चा झाली होती.
त्याच्या या वक्तव्यानंतर भाजपचा आयटी सेल कार्यरत झाला. त्यांनी आमीर खानविरोधात वातावरण तापवायला सुरुवात केली. साध्वी खोसला या कार्यकर्तीनेही त्यात सहभाग घेतला. या आयटी सेलचे प्रमुख अरविंद गुप्ता यांच्याकडून आलेले मेसेज तिने सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर केले. भाजपच्या आयटी सेलकडून त्यावेळी कॉजेस डॉट कॉम या वेबसाईटवर एक कॅम्पेनही सुरु करण्यात आलं होतं. त्यामध्ये स्नॅपडीलने आपल्या ब्रॅण्ड अॅम्बॅसेडर पदावरुन आमीर खानला हटवावं, अशी मागणी करण्यात आली होती. अरविंद गुप्ता यांच्याकडून सर्व कार्यकर्त्यांना आलेल्या मेसेज आणि पोस्टचे स्क्रीन शॉट या साध्वी खोसलाने पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांच्याशी शेअर केले.
आमीर खानविरोधी ट्रोल्सनी आमीर खानच्या विरोधात राबवलेली प्रचार मोहीम एवढी मोठी होती की सोशल मीडियात विशेष लोकप्रिय असलेल्या अमूल बटरच्या जाहिरातीमध्येही त्याची दखल घेण्यात आली. शेवटी विक्रीवर परिणाम झाल्याचं कारण देऊन स्नॅपडीलने आमीर खानबरोबरचा करार पुढे सुरु ठेवण्यास नकार दिला.
जेव्हा भाजपच्या आयटी सेल प्रमुखांची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क केला तेव्हा अरविंद गुप्ता यांनी साध्वी खोसलाने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले. साध्वी खोसला ही पहिल्यापासूनच काँग्रेसची समर्थक होती. त्यामुळेच तिने भाजप सोशल मीडिया सेल सोडला. भाजप आयटी सेलने आमीर खान विरोधात कोणतीही मोहीम सुरु केली नसल्याचा दावाही त्यांनी केला.
पत्रकार स्वाती चतुर्वेदी याही काँग्रेस समर्थक असल्याचा आरोप अरविंद गुप्ता यांनी केला आहे. त्यामुळेच त्या अशा अप्रमाणित माहिती त्यांच्या पुस्तकात प्रकाशित करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भाजप कधीही ट्रॉलिंगला प्रोत्साहन देत नाही, भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर सोशल मीडिया पॉलिसी आहे, त्यानुसारच ते सोशल मीडियाचा वापर करतात, असंही अरविंद गुप्ता यांनी स्पष्ट केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement