गोव्यातली सगळी शूट्स सिल्वासा, दमणच्या दिशेने
महाराष्ट्रातील लॉकडाऊनमुळे अनेक मालिका चित्रिकरणासाठी गोव्यात गेल्या आहेत. मात्र, आता तिथेही चित्रिकरणावर बंदी आणण्यात आली. आता गोव्यातली सगळी शूट्स सिल्वासा, दमणच्या दिशेने निघाली आहेत.
गोव्यातल्या एंटरटेन्मेंट सोसायटीने गोव्यातल्या चित्रिकरणाच्या परवानग्या रद्द केल्यानंतर गोव्यात सुरू असलेल्या चित्रिकरणांना ब्रेक लागला. आता आपण कुठे जायचं या विचारात मालिकांचे निर्माते होते. अशातच इंडियन फिल्म एंट टेलिव्हिजन प्रोड्युसर्स कौन्सिल आणि चॅनल्स यांच्यात बैठक पार पडली. त्या बैठकीत चार महत्वाचे निर्णय घेतले गेले.
ही बैठक संध्याकाळी सहा वाजता सुरू झाली. जी बराच वेळ चालू होती. यात ठरलेल्या चार गोष्टी अशा, चॅनल कोणत्याही निर्मात्याला चित्रिकरणासाठी सक्ती करणार नाही. निर्मात्याला चित्रिकरण थांबवून परतायचं असेल तर त्याला ती मुभा असेल. तरीही निर्माते चित्रिकरण करायला तयार असतील तर चॅनल्स त्यांना सर्व ते सहकार्य करेल. कोणाही कलाकाराला या चित्रिकरणात भाग घ्यायचा असेल वा काही कारणाने तो असमर्थ असेल तर त्याला चित्रिकरण थांबवून घरी जायची मुभा असेल. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर एकमत झालं. कोणावरही चित्रिकरणासाठी कोणत्याही प्रकारची सक्ती केली जाणार नाहीय.
या बैठकीत आणखी एक महत्वाचा मुद्दा विचारात घेतला गेला तो कोव्हिड काळातल्या विम्याचा. पहिल्या लाटेवेळी निर्मात्यांनी आपल्या युनिटचा विमा काढला होता. या कोव्हिड विम्यात कलाकार कोव्हिडने आजारी पडला तर 2 लाखाची तरतूद होती. व त्यात दुर्दैवाने त्याचं निधन झालं तर 25 लाख रुपये त्याच्या कुटुंबियांना मिळणार होते. आता ही 2 लाखांची मर्यादा वाढवून 5 लाख करण्याच्या विचारात निर्माते आहेत. त्यासंदर्भात विमा कंपनीशी वाटाघाटी चालू असल्याची माहीती आयएफटीपीसीच्या सदस्याने दिली. याबद्दल लवकरच अधिकृत पत्रक काढलं जाणार आहे.
प्रोड्युसर्स कौन्सिल आणि चॅनलसोबतची बैठक झाल्यानंतर लगेचच या बैठकीतले मुद्दे निर्मात्यांकडे शेअर झाले. त्यानंतर अनेक निर्मात्यांनी गोव्यातून आपला मोर्चा उंबरगाव, दमण, सिल्वासा या ठिकाणी नेण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. मुळात दमण, सिल्वासा इथे चित्रिकरणासाठी जागा आहेत का? राहायची व्यवस्था आहे का? याची चाचपणी सुरू आहे. येत्या दोन दिवसांत कोण कुठे चित्रिकरण करते आहे ते कळेल.
या सगळ्या धावपळीत केंद्राने लॉकडाऊन लावला तर मात्र कोणताच पर्याय न उरता सर्वांना शक्य असेल तसे परत येणे हाच पर्याय असल्याचंही या बैठकीवेळी बोललं गेलं.