Akash Thosar : नाद करायचा नाय! आकाश ठोसर रमला शेतीच्या कामात; ट्रॅक्टर चालवतानाचा व्हिडीओ व्हायरल
Akash Thosar : आकाश ठोसरने टॅक्टर चालवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Akash Thosar Video : अभिनेता आकाश ठोसरला (Akash Thosar) 'सैराट' (Sairat) या सिनेमाच्या माध्यमातून चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी त्याचा 'घर बंदूक बिरयानी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. आता आकाश ठोसरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आकाश ट्रॅक्टर चालवताना दिसत आहे.
आकाश ठोसरने ट्रॅक्टर चालवतानाचा व्हिडीओ शेअर करत 'नाद', असं कॅप्शन लिहिलं आहे. आकाशने सध्या त्याच्या कामातून ब्रेक घेतला असून तो आता गावी शेतीच्या कामात रमला आहे. ट्रॅक्टर चालवण्याचं कामदेखील तो करत आहे. आकाशला ट्रॅक्टर चालवताना पाहून त्याच्या चाहत्यांचा आनंदही गगनात मावेनासा झाला आहे. चाहते कमेंट्स करत त्याचं कौतुक करत आहेत.
चाहत्यांनी केल्या 'सैराट'च्या आठवणी ताज्या
'सैराट' सिनेमात आर्ची ट्रॅक्टर चालवताना दिसत आहे. आकाशला ट्रॅक्टर चालवताना पाहून चाहत्यांना आर्चीची आठवण झाली आहे. 'आर्चीचा ट्रॅक्टर कधी चोरला?', अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. तर दुसरीकडे सेलिब्रिटी असूनही शेतीची कामं केल्याने आकाशचं कौतुक होत आहे. आकाश तुझा अभिमान वाटतो, लव्ह यू भावा, तू एवढा मोठा सेलिब्रिटी झालास तरी आपल्या काळ्या आईला विसरला नाहीस, तुझा खूप अभिमान वाटतो मित्रा, एक ही तो दिल है कितनी बार जितोगे, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
View this post on Instagram
आकाशने याआधी 'उन्हाळ्याची सुट्टी', असं कॅप्शन देत व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये तो मटणावर ताव मारताना दिसला होता. त्याने स्वत: झाडावर चढून आंबा काढला आणि तो खाल्ला. या व्हिडीओवर गावाकडची मजा काही औरच असते, अशा कमेंट चाहत्यांनी केल्या होत्या. आकाशचा मटणावर ताव मारतानाचा आणि ट्रॅक्टर चालवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
आकाश ठोसरने फक्त मराठीतच नाही तर बॉलिवूडच्या सिनेमांत काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. 2016 साली त्याने 'सैराट' या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. या सिनेमामुळे तो रातोरात सुपरस्टार झाला. आजही त्याच्या परशाची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे.
संबंधित बातम्या