Sairat : 'सैराट' सात वर्षांचा झाला जी! आकाश ठोसरची खास पोस्ट
Sairat : 'सैराट' हा सिनेमा प्रदर्शित होऊन सात वर्षे झाली असली तरी आजही या सिनेमाची क्रेझ कायम आहे.
Akash Thosar On Sairat Movie : नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित 'सैराट' हा मराठी सिनेमाला आज सात वर्ष झाली आहेत. सात वर्षांपूर्वी हा सिनेमा प्रचंड गाजला. आजही या सिनेमाची क्रेझ कायम आहे. या सिनेमाला सात वर्ष पूर्ण झाल्यामुळे आकाश ठोसरने (Akash Thosar) खास पोस्ट लिहिली आहे.
आकाशने 'सैराट' सिनेमाच्या पोस्टरचा एक फोटो शेअर करत लिहिलं आहे,"सैराट' सिनेमाला आज सात वर्षे पूर्ण झाली...29 एप्रिल". आकाशच्या या पोस्टवर आजही हा सिनेमा सिनेमागृहात दाखवला गेला तरी सिनेप्रेमी तेवढीच गर्दी करतील, 'सैराट' सारखे सिनेमे पुन्हा प्रदर्शित व्हायला हवेत, या सिनेमाने वेड लावलं, 'सैराट 2' कधी प्रदर्शित होणार? कितीही वेळा पाहिला तरी पुन्हा पुन्हा पाहावा असा 'सैराट', अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
View this post on Instagram
'सैराट' या सिनेमामुळे रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर हे नवोदित कलाकार रातोरात स्टार झाले. 29 एप्रिल 2016 रोजी 'सैराट' हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. सिनेमागृहांपासून दुरावलेल्या प्रेक्षकांची पाऊले पुन्हा एकदा सिनेमागृहाकडे वळवण्यात या सिनेमाला यश आलं. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली.
'सैराट' या सिनेमाचं कथानक काय? (Sairat Movie Story)
'सैराट' या सिनेमात समाजाचं वास्तव दाखवण्यात आलं होतं. फासेपारधी जातीत जन्मलेला परश्या गावच्या राजकारणात सक्रिय असलेल्या पाटलाच्या मुलीच्या अर्थात आर्चीच्या प्रेमात पडतो. त्यानंतर घरच्यांचा विरोध पत्करत ते दोघेजण हैदराबादला पळून जाऊन लग्न करतात. अखेर शेवटी सुडाने जळफळत असलेला आर्चीचा भाऊ त्यांचा शोध घेतो आणि दोघांनाही ठार मारतो. सिनेमातील हे शेवटचं दृष्य प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणतं.
'सैराट' या सिनेमाचं कथानक प्रेक्षकांना भावलं. पण सिनेमातील डायलॉग आणि गाणीदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. 'सैराट झालं जी', 'याड लागलं', 'झिंग झिंग झिंगाट' या सिनेमातील गाण्यांनी प्रेक्षकांना वेड लावलं आहे. तर 'मराठीत सांगितलेलं कळत न्हाय...इंग्रजीत सांगू I love You','कसं काय आत्या बर हाय ना...इथून थेट मी शेतात जाणारए...बरं का...इथून थेट शेतात जाणारए मी", हे डायलॉग सुपरहिट ठरले.
संबंधित बातम्या