आमिरचा युटर्न! 'मोगल' सिनेमात काम करणार, कारण...
गेल्यावर्षी, 'मोगल' या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक सुभाष कपूर यांच्यावर 'मी टू' प्रकरणात आरोप झाल्यानंतर आमिरनं या फिल्मपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता.
मुंबई : 'कॅसेटकिंग' म्हणून ओळखल्या गेलेल्या गुलशन कुमार यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात यायचं 'मि. परफेक्शनिस्ट' आमिर खाननं नक्की केलंय. चित्रपटाच्या दिग्दर्शकावर 'मी टू' प्रकरणात आरोप झाल्यानंतर गेल्या वर्षी आमिरनं 'मोगल'मध्ये काम करणार नसल्याचं घोषित केलं होतं. 'हिंदुस्तान टाईम्स' या वृत्तपत्राला दिलेल्या खास मुलाखतीत आमिरनं हा खुलासा केलाय.
गेल्यावर्षी, 'मोगल' या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक सुभाष कपूर यांच्यावर 'मी टू' प्रकरणात आरोप झाल्यानंतर आमिरनं या फिल्मपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. 'मोगल' ही फिल्म 'टी-सीरिज' या फिल्मी आणि अन्य धार्मिक संगीताच्या ऑडिओ कॅसेट बनवणाऱ्या कंपनीचे प्रमुख गुलशन कुमार यांच्या जीवनावर बेतली आहे.
मात्र, सुभाष कुमार यांच्यावर 'मी टू' प्रकरणात आरोप झाल्यानं आमिरनं 'मोगुल' सोडली होती. त्याच्यासोबतच काम करणं कसं वाटेल? या प्रश्नावर आमिर म्हणाला की, महिलांच्या आत्मसन्मानाचा मला आदरच आहे. मी अजूनही 'मी टू' मोहिमेचं समर्थनच करतो. मात्र, जसं ऑफिसमधील लैंगिक छळाविरूद्ध तक्रार करण्यासाठी अंतर्गत समिती असते, तसं हे प्रकरण नाही.
याबाबत निवाडा करण्याचा अधिकार न्यायालयाचा आहे. मी माझ्या हृदयाचं आणि सद्सदविवेक बुद्धीचं ऐकतो. तेव्हा (गेल्या वर्षी) मला जे योग्य वाटलं ते मी केलं. आज मला वेगळं वाटतंय. लोक माझ्यावर टीका करतील, मात्र मी तेच करेन जे माझं हृदय आणि मन मला सांगेल.
'मोगल'मध्ये गुलशन कुमार यांची भूमिका स्वत: आमिर खान करणार आहे. गुलशन कुमार यांचे चिरंजीव भूषण कुमार या फिल्मचे निर्माते आहेत.