(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Adinath Kothare : बँकेने घरावर जप्ती आणली, मुंबईत बेघर झालो...अभिनेता आदिनाथ कोठारेने सांगितला कुटुंबावर ओढावलेला किस्सा
Adinath Kothare Mahesh Kothare : आदिनाथने मराठी सिनेसृ्ष्टीसह बॉलिवूड चित्रपटात मिळालेल्या संधीचे सोनं करत आपली छाप सोडली आहे. माझा छकुला या चित्रपटातून बालकलाकार म्हणून त्याचा सुरू झालेला प्रवास सध्या मराठीतील आघाडीचा कलाकार इथपर्यंत आला आहे.
Adinath Kothare Mahesh Kothare : मराठी सिनेसृष्टीत आपली छाप सोडणारा अभिनेता आदिनाथ कोठारेची (Adinath Kothare) तरुणाईमध्ये चांगलीच क्रेझ आहे. आदिनाथने मराठी सिनेसृ्ष्टीसह बॉलिवूड चित्रपटात मिळालेल्या संधीचे सोनं करत आपली छाप सोडली आहे. 'माझा छकुला' या चित्रपटातून बालकलाकार म्हणून त्याचा सुरू झालेला प्रवास सध्या मराठीतील आघाडीचा कलाकार इथपर्यंत आला आहे. मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते-निर्माते महेश कोठारे (Mahesh Kothare) यांचा मुलगा या चौकटीच्या बाहेर आदिनाथने स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. आदिनाथने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या कुटुंबावर ओढावलेला प्रसंग सांगितला.
आदिनाथ कोठारे याची मुख्य भूमिका असलेला 'शक्तिमान' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आदिनाथने लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत कुटुंबावर ओढावलेल्या परिस्थितीची आठवण सांगितली. या गंभीर परिस्थितीला सामोरे जाऊन वडील महेश कोठारे यांनी मात केल्याने ते माझ्यासाठी शक्तिमान असल्याचे आदिनाथ कोठारे याने सांगितले.
आदिनाथ कोठारेने काय म्हटले?
आदिनाथ कोठारे याने सांगितले की, त्यावेळी नुकतीच टीवायची परीक्षा दिली होती. बाबांचे (महेश कोठारे) मागचे दोन सिनेमे चालले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर खूप कर्ज होतं. त्याच काळात आम्ही खबरदार चित्रपट शूट करत होतो. या चित्रपटासाठी मी बाबांसोबत असिस्टंट म्हणून काम करत होतो. आम्ही कोल्हापूरला असताना बँकेने कर्जाचे हप्ते न दिल्याने आमचे मुंबईतील घर सील केले. म्हणजे एकप्रकारे आमच्याकडे मुंबईत घरच नव्हते.
शूटिंग पूर्ण केलं... मला पुण्यात पाठवलं
या गोंधळाच्या वातावरणात खबरदार चित्रपटाचे चित्रीकरण आम्ही संपवले. या काळात आई-बाबांनी आम्हाला कोणालाच काही कळू दिलं नाही, माझ्या आजी-आजोबांनाही कळू दिले नाही. त्यानंतर मी आणि माझे आजी-आजोबा पुण्याला येऊन राहिलो. माझे आई-बाबा मुंबईत घर शोधत होते. त्यानंतर मग आम्ही कांदिवलीत शिफ्ट झालो. 2005 दरम्यान ही गोष्ट घडली. या कठीण आव्हानात्मक परिस्थितीमध्येही माझ्या वडिलांनी माझ्या पुढच्या अभ्यासासाठी पुन्हा कर्ज घेतलं. ते कसं फेडणार, काय करणार काही माहीत नाही. पण, शिक्षण थांबलं नाही पाहिजे. त्यामुळे माझ्या आयुष्यात आई-वडील हेच माझे शक्तिमान असल्याचे कृतज्ञतापूर्वक आदिनाथने नमूद केले.
शक्तिमान प्रेक्षकांच्या भेटीला...
24 मे पासून शक्तिमान हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. "कॉफी आणि बरंच काही ", "अँड जरा हटके " , "हंपी" आणि "सायकल" सारख्या गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. “शक्तिमान“ हा चित्रपट घरातल्या प्रत्येक लहान मुलं , त्यांची प्रेमळ आई , आणि त्यांचा सुपरहिरो बाबासाठी असल्याचे त्यांनी सांगितले. या चित्रपटात आदिनाथ कोठारेसह स्पृहा जोशी, प्रियदर्शन जाधव, विक्रम गायकवाड आणि ईशान कुंटे यांची भूमिका आहे.