'माझ्या बायकोचेही साडेतीन लाख थकलेत, शशांकनं एवढा तमाशा...'; निर्मात्याच्या पोलखोलवर अभिनेत्रीच्या नवऱ्याची कमेंट
Shashank Ketkar–Mandar Devasthali Controversy: माधवी जुवेकरचे साडेतीन लाख रुपये अजूनही थकले. माधवीच्या नवऱ्याने कमेंट करून दिली माहिती.

Shashank Ketkar–Mandar Devasthali Controversy: काही दिवसांपूर्वी मराठी कलाकार शशांक केतकर (Shashank Ketkar) याने निर्माता - दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. निर्मात्याने पैसे थकवले असल्याचा आरोप केला होता. शशांकने यासंबंधित काही स्क्रीनशॉट्स देखील शेअर केले होते. त्यानं व्हिडिओ देखील शेअर केला होता. ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाली. या पोस्टवर अनेकांनी त्यांच्या कमेंटमध्ये आपआपले थकवलेल्या पैशांबाबत माहिती दिली. या प्रकरणात अभिनेत्री माधवी जुवेकर यांच्या पतीनं प्रतिक्रिया दिली आहे. शशांकने टोकाचं पाऊल उचलू नये, असं मत प्रशांत लोके यांनी व्यक्त केलं.
सोशल मीडियावर सध्या बरेच कलाकार निर्मात्यांची पोलखोल करत आहेत. शशांक केतकरचे देखील काही पैसे थकवले गेले असल्याचं त्याचं म्हणणं आहे. 5 वर्षांपूर्वीच ही मालिका संपली. मात्र, तरीही या मालिकेचं मानधन शशांक केतकरला मिळाले नाही, असा आरोप त्याने केला. ही पोस्ट व्हायरल होताच, अनेकांनी त्यांच्या थकलेल्या पैशांचे गणित मांडले. या पोस्टवर अभिनेत्री माधवी जुवेकरचे पती प्रशांत लोके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माहितीनुसार, माधवी जुवेकर यांचे देखील काही पैसे थकले होते. माधवीच्या थकलेल्या पैशांबाबत माहिती देत प्रशांत लोके म्हणालेत, "इतकं टोकाचं पाऊल उचलायला नको हवं होतं", असं म्हणालेत.
"आता मी शशांक केतकर अन् मंदार देवस्थळी यांच्याबद्दल लिहितो.. माझी बायको माधवी जुवेकर देखील त्या मालिकेत एक पात्र साकारत होती. मंदार देवस्थळी आधी रेग्युलर पेमेंट पाठवत होता. मी चेक स्वत: बँकेत टाकत होतो. पण अजून माझ्या बायकोचे साडे तीन लाख रूपये थकले आहेत. पण तिनं कधीही सोशल मीडियावर याची माहिती दिली नाही. मंदार स्वत: कर्जबाजारी झाला की, पैसे देऊन कुठे तोंड काळं करून आला, माहित नाही. पैसे बुडाले की काय अन् कसा त्रास होतो, हे मला ठाऊक आहे. पण राकेश सारंग, ज्ञानेश भालेराव आणि विद्याधर पाठारे हे पैसे न बुडवणारे निर्माते माझ्या नशिबी आले. हे निर्माते स्वत:चे घर विकतील पण लोकांचे कधीच पैसे थकवणार नाहीत".
"रेग्युलर पेमेंट करणाऱ्या मंदारचा काहीतरी प्रॉब्लेम झाला असावा. किंवा नसेलही.. पण शशांकने एवढा तमाशा करायला नको होता. माझे केदार शिंदेने पैसे बुडवले आहेत. पण काही पुरावे नसल्यामुळे मी त्याबद्दल कुणालाही बोलत नाही. माधवी जुवेकर बेएसटीतील सुट्ट्यांचं गणित सांभाळून मालिका करत होती. पण तिचेही पैसे थकले. सगळेच निर्माते ग्रेट नसतात. मी मंदारचं या ठिकाणी समर्थन करत नाही. पण हा विषय थांबला पाहिजे. माधवीला कष्टाचे पैसे आठवतात. पण ती पुढच्या कामाला लागली", असं प्रशांत म्हणाला.























