अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी 'या' अभिनेत्याला अटक
किशोर अमन शेट्टीने 'डान्स इंडिया डान्स' या डान्स रिअलिटी शोमध्ये भाग घेतला होता आणि 'एबीसीडी: एनीबडी कॅन डान्स' या बॉलिवूड चित्रपटाचा तो भाग होता.
बंगळुरु : प्रतिबंधित अंमली पदार्थ बाळगणे आणि विक्रीचा प्रयत्न केल्याप्रकरणी अभिनेता, नृत्यदिग्दर्शक, डा्न्सर किशोर अमन शेट्टी याच्यासह दोघांना अटक करण्यात आली आहे. बंदी असलेलं एमडीएमए विकण्याचा प्रयत्न केल्याबद्दल या सर्वांना अटक करण्यात आली आहे. शनिवारी पोलिसांनी याबाबत माहिती दिली. कर्नाटक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना शनिवारी सकाळी अटक करण्यात आली.
कर्नाटकच्या मंगलूरू शहर पोलीस आयुक्त विकास कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर अमन शेट्टी आणि त्याचा साथीदार अकील नौशील या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे चौकशी केली असा त्यापैकी किशोर शेट्टीने बॉलिवूड चित्रपटात काम केले असून तो नृत्यदिग्दर्शक आहे. हे दोघे बाईकवरून जात असताना त्यांना पोलिसांनी अटक केली.
मुंबईहून हे अंमली पदार्थ मागवण्यात आलं होतं. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. दोघांकडून एक बाईक, दोन मोबाइल फोन आणि अंमली पदार्थ एमडीएमए जप्त केले आहे. एमडीएमएची किंमत जवळपास एक लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
अंमली पदार्थ प्रतिबंध कायदा एनडीपीएस अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर अमन शेट्टीने 'डान्स इंडिया डान्स' या डान्स रिअलिटी शोमध्ये भाग घेतला होता आणि 'एबीसीडी: एनीबडी कॅन डान्स' या बॉलिवूड चित्रपटाचा तो भाग होता.