ए.आर रहमानवर नेटीझन्सचा संताप; टीकेची झोड उठताच म्हणाले, 'माझा कुणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता', नेमकं प्रकरण काय?
A.R. Rahman Issues Clarification on Religious Bias Remark: ए. आर. रहमान यांच्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर वाद. बॉलिवूडमध्ये कमी काम मिळण्यावर केलेला दावा चर्चेत.

A.R. Rahman Issues Clarification on Religious Bias Remark: संगीतकार ए. आर रहमान यांनी आपल्या अनोख्या संगीतशैलीतून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. त्यांनी आपल्या संगीतशैलीतून प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप सोडली. जय हो, तु ही रे, कहना ही क्या, दिल से, ही गाणी कालांतराने जुनी जरी झाली असली तरी, अजुनही प्रेक्षक आवर्जून ऐकतात. मात्र, सध्या ए. आर रहमान वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. ते एका वक्तव्यामुळे प्रचंड ट्रोल झाले होते. एका मुलाखतीत त्यांनी खळबळजनक दावा केला होता. त्यांनी म्हटलं की, "गेल्या आठ वर्षांपासून बॉलिवूडमध्ये आपल्याला अपेक्षेप्रमाणे कमी काम मिळत आहे, यामागे धार्मिक किंवा जातीय कारणं असू शकतात", असं ए. आर रहमान म्हणाले होते. त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मनोरंजन सिनेसृष्टीत खळबळ उडाली.
ए. आर रहमान यांनी केलेल्या वक्तव्याची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा झाली होती. तसेच कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी नाराजी व्यक्त केली. ए. आर रहमान यांनी केलेलं वक्तव्य सोशल मीडियात व्हायरल होताच त्यांनी यावर स्पष्टीकरण दिलं. त्यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियात शेअर केला. व्हिडिओमध्ये ए. आर रहमान म्हणतात, "माझ्यासाठी संगीत हे नेहमीच आपल्या संस्कृतीशी जोडले जाण्याचं तसेच तिच्याशी एकरूप होण्याचं एक सुंदर माध्यम आहे. भारत माझे घर आहे. माझे गुरू तसेच संगीत माझी प्रेरणा आहे", असं ते म्हणाले.
"मला असं वाटतं की कधीकधी तुमच्या बोलण्याचा गैरसमज होऊ शकतो. पण आजवर माझा हेतू कायम सेवा करण्याचा राहिला आहे. माझा कुणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. मला विश्वास आहे की, मी मांडलेला मुद्दा समजून घेतला जाईल. भारतीय असल्याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो. कारण इथे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सांस्कृतिक विचारांचा सर्वांकडून आदर केला जातो", असं ए. आर रहमान यांनी स्पष्ट केलं.
नेमकं काय घडलं?
बीबीसी एशियन नेटवर्कला दिलेल्या एका मुलाखतीत ए. आर रहमान यांनी आपल्या अनुभवांबद्दल सांगितलं, "गेल्या आठ वर्षांत सत्तेची समीकरणं बदलल्यानंतर अनेक गोष्टीही बदलल्या आहेत. आज सर्जनशील नसलेल्या लोकांच्या हातात सत्ता आहे. माझ्यासमोर कुणीही थेट काही बोललं नाही, मात्र माझ्या मागे धार्मिक कारणांवरून राजकारण झाल्याचं मला ऐकायला मिळालं आहे", असं ए. आर रहमान म्हणाले. दरम्यान,त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियात प्रचंड चर्चा रंगली. या चर्चेनंतर त्यांनी आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिलं.
























