Yashwant Killedar : महापालिकेसाठी मनसेचा गटनेता ठरला, राज ठाकरेंचा खंदा शिलेदार बीएमसी सभागृह दणाणून सोडणार
BMC MNS Group Leader : मुंबई महाालिकेत मनसेचे 6 नगरसेवक निवडून आले असून ते सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील असा विश्वास राज ठाकरेंनी व्यक्त केला आहे. आता मनसेने त्यांचा गटनेताही ठरवला.

मुंबई : एकीकडे महापौर पदावरुन महायुतीमध्ये गोंधळाची परिस्थिती कायम असताना दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्मान सेनेने त्यांचा महापालिकेतील गटनेता ठरवला आहे. मनसेच्या नगरसेवकांचा गटनेता म्हणून यशवंत किल्लेदार (Yashwant Killedar) यांची नेमणूक करण्यात आली. शिवतीर्थवर पार पडलेल्या बैठकीत पक्षाने हा निर्णय घेतला. या बैठकीसाठी सर्व नवनियुक्त नगरसेवक, मनसे नेते बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर आणि नितीन सरदेसाई उपस्थित होते.
गटनेतेपदी निवड झाल्याची माहिती यशवंत किल्लेदार यांनी माध्यमांना दिली. ते म्हणाले की, आज सर्व नगरसेवकांची बैठक पार पडली. त्यामध्ये गटनेता म्हणून आपली निवड झाली. पक्षाकडून कोणत्याही प्रकारचं प्रतिज्ञापत्र घेतलं नाही, पक्षाला तशी गरज वाटली नाही.
Yashwant Killedar Mumbai Ward : शिवसेना भवनाच्या प्रभागातून निवड
मुंबई महापालिकेत मनसेचे सहा नगरसेवक निवडून आले आहेत. प्रभाग क्रमांक 192 मधून मनसेचे यशवंत किल्लेदार विजयी झाले आहेत. यशवंत किल्लेदार यांनी शिवसेनेच्या प्रीती पाटणकर यांचा 1 हजार 425 मतांनी पराभव केला. यशवंत किल्लेदार हे शिवसेना भवनाच्या प्रभागातून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यामुळे त्यांचं जिकणं हे मनसेसाठी मोठा विजय मानला जात आहे.
राज्यातील 29 महापालिकांच्या महापौरपदाची सोडत 22 जानेवारीला निघणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दावोस दौऱ्यावर असून ते परत आल्यानंतर महापौरपदाची सोडत निघणार आहे.
BJP Corporaters Mumbai : मुंबईबाहेर जाऊ नका, भाजपच्या सूचना
पुढचे आठ दिवस मुंबई बाहेर जाऊ नका अशा सूचना भाजपकडून नवनिर्वाचित नगरसेवकांना देण्यात आल्या आहेत. मुंबई महापालिकेत सत्तास्थापनेसाठी आठ ते दहा दिवस लागणार आहेत. त्यामुळे कोणीच मुंबईबाहेर जाऊ नका अशा सूचना भाजपच्या नगरसेवकांना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, महापौरपदाचं आरक्षण जाहीर झाल्यावर भाजप सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Mumbai Mayor Election : पडद्यामागे ठाकरे गटासोबत भाजपची चर्चा?
मुंबई महापौरपदावरून ठाकरे-भाजपमध्ये बोलणी झाली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मुंबई महापालिकेत 2017 सालाची भरपाई ठाकरे भाजपला करुन देणार असल्याची चर्चा आहे. 2017 साली ठाकरेंचा महापौर व्हावा म्हणून भाजपनं माघार घेतली होती. अशातच, महापौर निवडीवेळी ठाकरेंचे नगरसेवक गैरहजर राहणार असल्याची चर्चा सुरू आहे.
मुंबईत महापौर आपल्याच पक्षाचा व्हावा यासाठी शिंदेंची शिवसेना प्रयत्न करत असल्याची माहिती आहे. अशात, ठाकरेंचे 65 नगरसेवक महापौर निवडीवेळी गैरहजर राहून भाजपला मदत करु शकतात अशी चर्चादेखील रंगली आहे. महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची शिवसेना गैरहजर राहिल्यास ती निवडणूक बिनविरोध होईल.
मुंबई महापालिकेचा अंतिम निकाल-(BMC Election Result 2026)
भाजप - 89
शिवसेना - 29
शिवसेना ठाकरे गट - 65
काँग्रेस - 24
मनसे - 6
एमआयएम- 8
एनसीपी - 3
एसपी - 2
एनसीपी शप - 1
---
एकूण- 227
ही बातमी वाचा:




















