एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
उरण विधानसभा मतदारसंघ | शिवसेनेसाठी आव्हानाची तर शेकापसाठी अस्तित्वाची लढाई
जर युती झाली तर मात्र शिवसेनेसाठी थोडासा दिलासा असण्याची शक्यता आहे. परंतु युती झाली नाही तर मात्र शिवसेनेसाठी ही जागा टिकवणं आव्हानात्मक ठरणार आहे.
उरण विधानसभा मतदारसंघ उरण तालुका, पनवेल तालुक्यातील काही भाग मिळून तयार झाला आहे. झपाट्याने वाढणारा उरण हा भाग अनेकार्थांनी महत्त्वाचा आहे. इथे बहुचर्चित आणि प्रस्तावित नवी मुंबई विमानतळ, जेएनपीटी, ओएनजीसी प्रकल्प, रसायनीची जुनी एमआयडीसी म्हणजे पाताळ गंगा एमआयडीसी, ऐतिहासिक एलिफण्टा लेण्यांचा समावेश होतो.
आजवर उरण विधानसभा मतदारसंघावर शेतकरी कामगार पक्षाचं वचर्स्व राहिलं होतं. मात्र 2014 साली इथे बहुरंगी सामना झालेला होता. 2014 ला भाजपच्या महेश बाल्डी यांना 32 हजार सहाशे 32, काँग्रेसच्या महेंद्र घरत यांना 34 हजार दोनशे 53, मनसेच्या अतुल भगत यांना तीन हजार, राष्ट्रवादी काँग्रेसला तीन हजार आणि शेकापच्या विवेकानंद पाटील यांना 55 हजार 320 मतं मिळाली होती तर शिवसेनेच्या मनोहर भोईर यांना 56 हजार 131 मतं मिळाली होती. त्यामुळे चुरशीच्या या सामन्यात शिवसेना फक्त 811 मतांनी विजयी झाली होती.
उरण विधानसभा मतदारसंघात जवळपास मतदारांची संख्या ही दोन लाख नव्वद हजारच्या घरात आहे. ज्यात प्रामुख्याने 40 टक्के हा युवा मतदार आहे. तर जिंकण्यासाठी इथे आगरी, कोळी मतदारांवर भिस्त जास्त असते.
2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये उरण हा मतदारसंघ मावळमध्ये येत असल्याने इथे थेट लढत होती शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादीच्या पार्थ पवार यांच्यात. यामध्ये शिवसेनेला 7 लाख 20 हजार मतं मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेसला 5 लाख चार हजार मतं मिळाली होती. स्वाभाविक श्रीरंग बारणे हे दोन लाख मतं जास्त घेऊन विजयी झाले.
परंतु लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान उरण विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसला 86 हजार मतं मिळाली होती तर शिवसेनेला 89 हजार मतं मिळाली होती. केवळ 3000 मतांचीच शिवसेनेला आघाडी याठिकाणी लोकसभा निवडणुकीतही बघायला मिळाली होती. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीतही चुरस होणार यात शंका नाही.
यावेळी जर युती झाली तर मात्र शिवसेनेसाठी थोडासा दिलासा असण्याची शक्यता आहे. परंतु युती झाली नाही तर मात्र शिवसेनेसाठी ही जागा टिकवणं आव्हानात्मक ठरणार आहे.
शिवाय युती झाली तरी भाजपचे इच्छुक असेलेले महेश बाल्डी हे बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत. त्यामुळे इथे शिवसेनेसमोर युती झाली तरी मोठा पेच उभा राहण्याची शक्यता आहे. शिवाय इथं आघाडीचं एक मोठ्ठं आव्हान सेनेसमोर असणार आहे.
आजवर उरणवर वर्चस्व राहिलेल्या शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची इथे आघाडी होऊ घातली आहे. त्यामुळे शेकापकडून जिंकण्यासाठी इथे सर्वोतोपरी प्रयत्न होऊ शकतात. पण या सगळ्यात इथला प्रत्येक पक्षाचा मतदार हा सुद्धा ठरलेला आहे. सोबतच शेकापकडे स्टार प्रचारक नसल्यानं इथे उमेदवाराची धावपळ मोठ्या प्रमाणात असते.
शिवाय भाजप आणि सेनेचं रायगड आणि परिसरातलं वाढतं प्राबल्य यामुळे शेकापसाठी उरण लढाई ही अस्तित्वाची असणार आहे.
उरण मतदारसंघ हा 90 टक्के ग्रामीण भाग असलेला आहे. जेएनपीटीबंदर असल्यानं एक हेविवेट मतदारसंघ म्हणूनही ओळखला जातो. विकासाच्या दिशेने जरी हा भाग पाऊलं टाकत असला तरी अनेक समस्यांनी ग्रस्तसुद्धा आहे.
रस्त्याची कामं आणि अवजड वाहनं यामुळे इथे सातत्यानं वाहतूक कोडींनी लोकं त्रस्त आहेत. शिवाय पोर्टमध्ये कंटेनर हे कंटेनर स्टोरेज स्टेशनमध्ये (सीएफएस) आधी 8 ते 10 दिवस ठेवले जायचे, परंतु आता कामाची प्रणाली बदलल्यानं सीएफएसमधून कपात करण्यात आली स्वाभाविकच स्थानिकांचा रोजगार निर्मितीचा प्रश्न निर्माण झाला.
शिवाय मतदारसंघातून मुंबई-पुणे-गोवा हायवे जातो. परंतु अद्ययावत आणि तातडीची मदत मिळेल असं इस्पितळ या भागात नाही. ओएनजीसीसारखे प्रकल्प आहेत पण सातत्यानं घडणाऱ्या आगीसारख्या घटनांनी शहरामध्ये कायम भीतीचं वातावरण असतं, आत्तापर्यंत मोठ्या नेत्यांचं कायमच याठिकाणी दुर्लक्ष पाहायला मिळाल्याचं मतदार सांगतात.
प्रस्तावित नवी मुंबई एअरपोर्टचं जमीन संपादनाची प्रक्रिया पूर्ण होत आली असली तरी 90 टक्के काम बाकी आहे. त्यामुळे उमेदवाराला मतं मागायाला जाताना स्थानिकांकडून पायाभूत सुविधांसह याबद्दलही प्रश्न विचारले जाऊ शकतात.
वर्ल्ड हेरिटेज एलिफण्टा लेण्यांचा भागही येतो. इथली जमीन किंबहुना हे बेट वनविभाग आणि पुरातत्व विभागाच्या अखत्यारित येतं. तरीही या परिसरात वर्षानुवर्ष राहणारे गावकरी आहेत ज्यांच्या घरात अलीकडेच वीज पोहचली आहे.
शिवाय 90 टक्के ग्रामीण भाग असल्यानं शेतीही इथे मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे एकंदरीत पर्यटन, औद्योगिक, वैद्यकीय सुविधांपासून दूर असलेल्या या मतदारसंघात उमेदवार मतांचा जोगावा मागायला गेल्यावर त्याला मतदार राजाच्या प्रश्नांचाही सामना करावा लागणार आहे.
त्यामुळे इथे आता दुहेरी लढत होते की गेल्यावेळी प्रमाणे बहुरंगी लढत होते आणि आगामी काळात इथल्या समस्या सोडवण्यात उमेदवाराला कितपत यश येतं हे पाहावं लागेल.
इच्छुक उमेदवार
शिवसेना - मनोहर भोईर ,
काँग्रेस - महेंद्र घरत,
शेतकरी कामगार पक्ष - विवेकानंद पाटील
भाजप – महेश बाल्डी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement