Cabinet expansion : मंत्रिमंडळ विस्ताराबाबत घडामोडींना वेग; उद्या राज्यातील महायुतीच्या नेत्यांची बैठक, अजितदादांची तटकरे अन् पटेल यांच्यासोबत तासभर खलबतं
Ajit Pawar and Cabinet expansion : मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उद्या राज्यातील महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार आहे, त्याआधी अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्यात एक तास बैठक पार पडली.
मुंबई: राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याचा शपथविधी काल (गुरूवारी) मुंबईतील आझाद मैदानावर पार पडला. त्यानंतर आता राज्यातील मंत्रीमंडळ विस्ताराच्या घडामोडींना वेग आला आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उद्या (शनिवारी) राज्यातील महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार असल्याची माहिती आहे. महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिन्ही वरिष्ठ नेत्यांची आज बैठक पार पडली. प्रफुल पटेल (Praful Patel) यांच्या सीजे हाऊस येथील निवासस्थानी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar), प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल (Praful Patel) यांच्यात एक तास बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. तर या बैठकीत 7 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री पदाचे चेहरे निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मंत्रिमंडळाचा विस्तार विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनापूर्वी
राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनापूर्वी करण्यात येईल, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल शपथविधीनंतर झालेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत दिले आहेत. त्यानुसार राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार हा पुढील आठवड्यात म्हणजेच 11 किंवा 12 डिसेंबरला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील हिवाळी अधिवेशनाला 16 डिसेंबरपासून नागपूरमध्ये सुरूवात होणार आहे, त्यापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती महायुतीतील नेत्यांनीही माध्यमांशी बोलताना दिली आहे. त्याआधी महायुतीतील पक्षांनी आपापल्या पक्षांतील बड्या नेत्यांसोबत बैठका चर्चा सुरू केल्याचं चित्र दिसून येत आहे.
कोणत्या पक्षाला किती मंत्रीपद मिळण्याची शक्यता?
काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडल्यानंतर आता मंत्रीमंडळ विस्तारामध्ये किती आणि कोणती खाती आपल्या पक्षाला मिळणार यासाठी चर्चा बैठका सुरू आहेत. तर शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ काल घेतली असली तरी देखील त्यांनी गृह खात्याचा आग्रह कायम ठेवल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. तर भाजपने गृह खात्याचा ऐवजी महसूल, नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम खाते त्यांना देण्याचा प्रस्ताव दिल्याची माहीती आहे. शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने आता भाजप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला देऊ केलेली खाती शिंदे स्वीकारतील, असा विश्वास भाजप नेत्यांना वाटत आहे.
शिवसेनेला 11 किंवा 12 मंत्रीपदे मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात असून राष्ट्रवादी काँग्रेसलाही शिवसेने इतरीच मंत्रीपदे हवी असल्याचं बोललं जातंय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुन्हा एकदा अर्थ खाते मिळावं, असा आग्रह आहे. पण गेल्या मंत्रिमंडळात मिळालेल्या खात्यांसह आणखीही काही अतिरीक्त खात्यांची मागणी राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षाने केली आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला कोणती खाती द्यावीत आणि त्यांच्या कोणत्या नेत्यांना मंत्रिमंडळात घ्यावं, याबाबत फडणवीस हे भाजप पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती आहे, याबाबतचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे.