पुण्यासह 157 मतदान केंद्र संवेदनशील, बारामतीत अनुचित प्रकार घडल्यास...; सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
Supriya Sule : बारामती लोकसभा मतदारसंघातील अनेक मतदान केंद्रं संवेदनशील असून त्या मतदान केंद्रांवर गैरप्रकार होऊ शकतो.
Supriya Sule : पुणे : राज्याचं लक्ष लागलेल्या पवार कुटुंबातील हायव्होल्टेज लढत असलेल्या बारामती (Baramati) लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे. य मतदारसंघातील मतदानाची तयारी प्रशासकीय स्तरावर पूर्ण झाली असून मंगळवारी येथे मतदान आहे. त्याच पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून कडक बंदोबस्त तैनात आहे. मात्र, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी या मतदारसंघातून निवडणूक लढवत असल्याने विशेष खबरदारी घेण्याची मागणी येथील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sul) यांनी केली आहे. दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी कौटुंबिक लढत होत आहे. एकीकडे शरद पवार तर दुसरीकडे अजित पवार (Ajit Pawar) यांची प्रतिष्ठा या लढतीतून पणाला लागली आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातील अनेक मतदान केंद्रं संवेदनशील असून त्या मतदान केंद्रांवर गैरप्रकार होऊ शकतो. त्यामुळे अशा मतदान केंद्रांवर खबरदारीचे उपाय योजण्यात यावेत अशी मागणी सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आलीय. या संवेदनशील बुथवर काही गैरप्रकार घडल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावर राहील असंही त्यांनी या तक्रारीमध्ये नमूद केलं आहे. सुप्रिया सुळेंकडून इ-मेलच्या मार्फत निवडणूक आयोगाकडे ही तक्रार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे बारामतीमधील जी मतदान केंद्रं संवेदनशील असल्याचा दावा करण्यात आलाय, त्या मतदान केंद्रांचे क्रमांकही निवडणूक आयोगाला देण्यात आले आहेत. दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघात 23 लाख 72 हजार 668 मतदार आहेत. मतदान केंद्रावर आजच मतापेट्या पोहचवल्या जातील. 380 मतदान केंद्र बारामती तालुक्यात आहेत. तर बारामती तालुक्यातील 3 हजार कर्मचारी ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहेत.
सुप्रिया सुळेंच्या तक्रारीत दावा
बारामती शहर - 12
बारामती ग्रामीण- 47
दौंड - 33
पुरंदर- 31
भोर 31
खडकवासला- 3
बारामती मतदारसंघातील हे मतदान केंद्र संवेदनशील असल्याने येथे अनुचित प्रकार घडू शकतो. त्यामुळे, तब्बल 157 मतदान केंद्रांवर विशेष लक्ष देण्याची व खबरदारीचा उपाय म्हणून काम करण्याची मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे.
बारामती प्रचारतील मुद्दे
- पवारांच्याच घरात दोन गट झाल्याने यंदाची निवडणूक वेगळी आहे
- सुप्रिया सुळे संविधान बचाव, शेतकरी, महागाई, बेरोजगारी, दुष्काळ या प्रश्नावरती लढत आहेत
- तर दुसरीकडे सुनिता पवार विकासाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक लढवत आहेत
- बारामती सारखा विकास मतदार संघातील इतर विधानसभा असलेल्या भागात करणार असल्याचा अजित पवार सातत्याने सांगतात
- विकासासोबतच विचारही महत्त्वाचा असल्याचं सुप्रिया सुळे सांगतात
- पवारांच्या कुटुंबाभोवती ही निवडणूक फिरत आहे
हेही वाचा
Supriya Sule: हाती नवऱ्याचा फोटो, समोर लेकीचं भाषण; बारामतीत पोरीसाठी पदर खेचून आई मैदानात