Shrinivas Vanaga: मोठी बातमी: 36 तास नॉट रिचेबल श्रीनिवास वनगा अखेर परतले, पण काही मिनिटं घरी थांबून पुन्हा घराबाहेर पडले
Shrinivas Vanga: शिंदे गटाचे पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा अखेर घरी परतले, ते एका मित्राच्या घरी थांबले होते, अशी माहिती पत्नीने दिली.
पालघर: शिंदे गटाकडून पालघर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्यामुळे प्रचंड दुखावलेले विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा हे सोमवारी संध्याकाळपासून बेपत्ता होते. अखेर 36 तास उलटल्यानंतर त्यांनी कुटुंबीयांना फोन करुन आपण सुखरुप असल्याचे सांगितले. त्यानंतर श्रीनिवास वनगा (Shrinivas Vanga) हे पालघरमधील आपल्या घरीही आले होते. घरी आल्यानंतर त्यांनी कुटुंबीयांशी काहीवेळ बातचीत केली. त्यानंतर श्रीनिवास वनगा हे कुटुंबीयांना सांगून पुन्हा घराबाहेर पडले.
श्रीनिवास वनगा यांचे दोन्ही मोबाईल फोन सोमवारी संध्याकाळपासून नॉट रिचेबल लागत होते. वनगा यांच्या मनात आत्महत्येचे विचार घोळत असल्याचे त्यांच्या पत्नीने सांगितले होते. त्यामुळे वनगा यांचे कुटुंबीय चिंतेत होते. अखेर मंगळवारी रात्री उशीरा श्रीनिवास वनगा कोणालाही पत्ता लागून न देता घरी आल्याचे सांगितले जाते. प्राथमिक माहितीनुसार, श्रीनिवास वनगा हे रात्री दोन ते तीनच्या दरम्यान घरी आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांची ही संपर्क साधल्याचे समजते. ते रात्री त्यांच्या मित्रांसोबत गेले आहेत असं त्यांच्या पत्नीने सांगितलं असून ते व्यवस्थित असल्याचंही सांगितलं आहे. सोमवारी संध्याकाळपासून ते आपल्या एका मित्राच्या घरी होते. ते सध्या प्रचंड डिप्रेशनमध्ये आहेत. शांत झाल्यावर ते घरी आले. आमच्याशी बोलून ते पुन्हा घराबाहेर पडले, अशी माहिती श्रीनिवास वनगा यांच्या पत्नीने दिली. मात्र, वनगा पुन्हा कुठे गेले, याबद्दल त्यांच्या कुटुंबीयांकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
शिंदे गटाने श्रीनिवास वनगा यांच्याऐवजी पालघर विधानसभेतून (Palghar Vidhan Sabha) राजेंद्र गावित यांना संधी दिली होती. श्रीनिवास वनगा यांनी सुरतच्या बंडावेळी एकनाथ शिंदे यांना साथ दिली होती. त्यामुळे आपल्याला पुन्हा उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा त्यांना होती. परंतु, शिंदे गटाने राजेंद्र गावित यांचे नाव जाहीर केल्यानंतर श्रीनिवास वनगा यांनी पत्रकारपरिषद घेऊन नाराजी व्यक्त केली होती. 'उद्धव ठाकरे हे देवमाणूस होते. मी घातकी माणसासोबत गेलो आणि माझा घात झाला', असे श्रीनिवास वनगा यांनी म्हटले होते.
श्रीनिवास वनगा यांचे विधानपरिषेदवर पुनवर्सन करण्याचे आश्वासन
श्रीनिवास वनगा हे बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या पत्नीने आकांत केला होता. माझे पती डिप्रेशनमध्ये आहेत, त्यांनी अन्नपाणी सोडून दिले आहे, असेही त्यांच्या पत्नीने म्हटले होते. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री शंभुराज देसाई यांनी वनगा यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला होता. श्रीनिवास वनगा यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात येईल, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी वनगा यांच्या पत्नीला दिल्याचे समजते.
दरम्यान, आता उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यामुळे श्रीनिवास वनगा ही निवडणूक लढवणार नाहीत, ही बाब स्पष्ट आहे. मात्र, आता निवडणुकीत ते कोणाची साथ देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. पडद्यामागे श्रीनिवास वनगा यांची शिंदे गट किंवा ठाकरे गटाशी काही बोलणी झाली आहेत का, हादेखील औत्स्युकाचा विषय आहे.
आणखी वाचा