Shrinivas Vanga : श्रीनिवास वनगा जीवन संपवण्याच्या विचारात, कुटुंबीयांचा दावा, एकनाथ शिंदेंना म्हणाले, तुम्ही शब्द पाळला नाही..
Shrinivas Vanga : पालघरचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांचं तिकीट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून कापण्यात आलं आहे. त्यांच्या जागी राजेंद्र गावित यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
पालघर : महायुतीमध्ये पालघरच्या जागेवर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून राजेंद्र गावित यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पालघरच्या जागेवर श्रीनिवास वनगा येथून उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर डिप्रेशनमध्ये गेल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बंडामध्ये सहभागी असलेल्या 39 आमदारांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, यामध्ये पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा हे एकमेव उमेदवारी न मिळालेले आमदार आहेत. विधानसभेला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर न झाल्यानंतर दु:खी झाल्याची माहिती त्यांची पत्नी सुमन वनगा यांनी दिली.
एकनाथ शिंदे जून 2022 ला सूरतला जाताना ज्या श्रीनिवास वनगा यांच्या मुलाच्या वाढदिवसाचे कारण दाखवून पालघरच्या दिशेनं गेले होते त्याच श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी नाकारण्यात आली. यामुळं श्रीनिवास वनगा मोठ्या प्रमाणात नाराज असून त्यांनी कालपासून अन्न पाणी सोडून दिलं असून ते पूर्णपणे मानसिक दृष्ट्या खचले असून आत्महत्या करण्याचा विचार करत आहेत, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. श्रीनिवास वनगा यांच्या या अवस्थेमुळं त्यांच्या कुटुंबामध्ये मोठ्या प्रमाणात भीती पसरली आहे.
सुमन वनगा काय म्हणाल्या?
माझे पती श्रीनिवास वनगा यांचं पालघर विधानसभेत व्यवस्थित काम सुरु होतं. ते प्रसिद्धी करत नव्हते. ते बांधणी करत होते, प्रामाणिक आणि एकनिष्ठ राहिले. 20 जून 2022 ला मुलाचा वाढदिवस असताना ते तिकडे गेले त्यावेळी त्यांना शब्द दिला होता की तुम्हाला घरी बसवणार नाही हा शब्द देण्यात आला होता. परंतु तो शब्द पाळण्यात आला नाही, असं सुमन वनगा म्हणाल्या. श्रीनिवास वनगा कालपासून जेवत नाही, कालपासून जेवत नाहीत, वेड्यासारखं वागत आहेत, आत्महत्या करणार म्हणतात, आयुष्य संपून गेलं असं म्हणतात, असं सुमन वनगा म्हणाल्या.
उद्धव साहेब आमच्यासाठी देव होते. माझी चूक झाली, शिदेंसाहेंबावर विश्वास ठेवला ही चूक झाली. 39 आमदारांचं पुनर्वसन केलं, माझ्या पतीचं काय चुकलं असा सवाल सुमन वनगा यांनी विचारला. श्रीनिवास वनगा तीन चार दिवस जेवत नाहीत. डहाणू विधानसभा देणार असं सांगितलं पण तिथून देखील उमेदवारी देण्यात आलेली नाही. माझे पती डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत. श्रीनिवास वनगा यांचा बरा वाईट झालं तर आम्ही कुणाला जबाबदार धरायचं असा सवाल सुमन वनगा यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे.
इतर बातम्या :