एक्स्प्लोर
Shivsena Manifesto | दहा रुपयात जेवण तर एका रुपयात आरोग्य चाचणी, शिवसेनेचा वचननामा जाहीर
उद्धव ठाकरे यांनी प्रचारसभांच्या भाषणामध्ये घोषित केलेला दहा रुपयात थाळी आणि एक रुपयात आरोग्य चाचणीच्या मुद्द्यासह शेतकरी, रस्ते, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी आश्वासनांची खैरात करण्यात आली आहे.
मुंबई : महाआघाडीचा संयुक्त जाहीरनामा आल्यानंतर आता शिवसेनेने आपला वचननामा (Shivsena Manifesto) जाहीर केला आहे. मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा वचननामा घोषित करण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी प्रचारसभांच्या भाषणामध्ये घोषित केलेला दहा रुपयात थाळी आणि एक रुपयात आरोग्य चाचणीच्या मुद्द्यासह शेतकरी, रस्ते, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी आश्वासनांची खैरात करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांसाठी दरवर्षी दहा हजार रूपयांची योजना, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी योजना, घरगुती विजेचे दर कमी करत 30 टक्क्यांपर्यंत आणणे, राज्यात 1000 भोजनालय तयार करून त्यात 10 रुपयांत उत्तम भोजन देणे, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणे, ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी विशेष बसेसची सोय, खतांचे दर स्थिर राहण्यासाठी योजना अशा अनेक आश्वासनांची खैरात शिवसेनेकडून करण्यात आली आहेत.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, अत्यंत प्रामाणिकपणे आम्ही हा वचननामा जनतेसमोर सादर करत आहोत. आमच्याकडून कोणताही प्रश्न अनुत्तरित राहणार नाही, असे वचन देतो. राज्याच्या तिजोरीचा विचार करून हा वचननामा तयार केला असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी आरेविषयी बोलताना ते म्हणाले की, आमचा आरे कारशेडला विरोध कायम आहे. सर्व पक्षांनी एकत्र येऊन आरेबाबत भूमिका स्पष्ट करावी, यासाठी केवळ शिवसेनेला जबाबदार धरू नका, असे ते म्हणाले. तसेच या निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळणार असून मी आकडे सांगत नाही, माझा आकड्यांवर विश्वास नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. दहा रूपयांत जेवण हे स्वच्छ, सकस असेल. यासाठी महिला बचत गटांना हे काम दिले जाईल, असेही ते म्हणाले.
यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, हा वचननामा खूप संशोधनानंतर बनविण्यात आला आहे. वचननामा तयार करण्याच्या प्रक्रियेत महिलांचा सहभाग सर्वाधिक होता. या वचननाम्यात सर्व गोष्टींचा विचार केला आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. पहिल्या दिवसापासून या वचननाम्यातील वचनांवर काम केले जाईल, असेही ते म्हणाले. यावेळी मुंबईच्या वचननाम्यात आरेचा उल्लेख जंगल असा केला जाईल, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
वचननाम्यातील महत्वाचे मुद्दे
प्रत्येक जिल्ह्यात 10 रुपयांत थाळी देणारे कॅन्टीन उभारणार
1000 भोजनालयं बनवणार त्यात 10 रुपयांत उत्तम भोजन
शेतकऱ्यांसाठी दरवर्षी दहा हजार रूपयांची योजना
एका रुपयात 200 पेक्षा अधिक आजारांवर आरोग्य चाचणी
आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुलींचे महाविद्यालयीन शिक्षण विनामूल्य करणार
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री शहर सडक योजना
15 लाख पदवीधर युवकांना 'युवा सरकार फेले अंतर्गत शिष्यवृत्तीची संधी देणार
शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करणार
प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयासह सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणार
ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी अनेक योजना
घरगुती वीजदर कमी 30टक्क्यांपर्यंत कमी करणार
शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार
ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी विशेष बसेसची सोय
तीर्थक्षेत्रांच्या प्रवासासाठी विशेष समन्वय केंद्रांची स्थापना
पीकविमा योजनेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्याची सोय करणार
पाच वर्षासाठी खतांचे भाव स्थिर ठेवणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
बीड
Advertisement